नागपूर- नागपुरात बाजारपेठेच्या वेळेत बदल करून निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहे. यात आज (दि. 20 मार्च) विभागीय आयुक्त कार्यलयात बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना पालकमंत्री नितीन राऊत यांनी माहिती दिली आहे.
या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित होते. तसेच खासदार कृपाल तुमाणे यांच्यासह आमदार, तसेच व्यापारी मंडळींशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे राऊत सांगितले.
नागपुरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहे. यामध्ये पोलिसांनी कोरोना योद्धा म्हणून जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन पालकमंत्री यांनी केले आहे. यात नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिक ऐकत नसल्याचे दिसून येत असल्याने कडक निर्बंध लावण्यात आले. विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याच्या इशारा पालकमंत्री राऊत यांनी दिल्या असून त्यासंबंधिच्या सूचना पोलीस विभागाला दिल्या आहेत.
यात मागील तीन दिवसात सर्व दुकाने दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले होते. यात बदल करण्यात आला असून 4 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंटच्या वेळात पूर्वी डायनिंगला बंदी होती. यात आता नव्याने 7 वाजेपर्यंत परवानगी असणार आहे. त्यानंतर रात्री 11 पर्यंत घरपोच (पार्सल) सुविधा सुरू असणार आहे.