नागपूर -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आटोपलेल्या चार लॉकडाऊननंतर आता लॉकडाऊनचा पाचवा टप्पा ‘मिशन बिगीन अगेन’ या शीर्षकांतर्गत सुरू झाला आहे. राज्य शासनाने यासंदर्भात काढलेले आदेश नागपूर महानगरपालिकेने कायम ठेवले आहेत. प्रतिबंधित क्षेत्र वगळता टप्प्याटप्याने तीन टप्प्यात काही गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याचे महानगर पालिकेने स्पष्ट केले आहे. 1 जूनपासून हे आदेश लागू होणार असून 30 जूनपर्यंत कायम राहतील
नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 1 जून रोजी जाहीर केलेल्या आदेशानुसार, 3 जूनपासून नागपूर शहरात काही गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. हे करताना नागरिकांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या कोव्हीड-१९ संदर्भातील सर्व दिशा-निर्देशांचे पालन करायचे आहे. यातील पहिला टप्पा 3 जूनपासून सुरू होणार असून खालील बाबींना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बगीचांमध्ये, खाजगी मैदानांवर, सोसायटी तसंच संस्थात्मक मैदानांवर, बगीचे या ठिकाणी सकाळी 5 ते 7 या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी इन्डोअर स्टेडियम किंवा बंदिस्त ठिकाणी यापैकी कशालाही परवानगी नसणार आहे.
पहिला टप्पा 3 जूनपासून -
- कोणत्याही प्रकारे एकत्र येऊन व्यायाम, जॉगिंग, सायकलिंग अशा कोणत्याही उपक्रमाला परवानगी नाही.
- प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- गॅरेज तसेच वर्कशॉप यांना काम करण्याची परवानगी आहे.
- अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व शासकीय/निम शासकीय कार्यालय वगळता इतर सर्व सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के कर्मचारी वर्ग अथवा 15 कर्मचारी यापैकी जे अधिक असेल अशा उपस्थितीत कार्य सुरू करता येईल.
दुसरा टप्पा 5 जूनपासून -
बाजारातील दुकानांना परवानगी
- सर्व मार्केट, दुकाने यांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत सम-विषम पध्दतीने परवानगी. मात्र, शॉपिंग मॉल आणि मार्केट उघडण्यास मनाई.
- कपड्यांच्या दुकानांमध्ये ट्रायल रुमची व्यवस्था अनुज्ञेय असणार नाही.
- सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जातील याची जबाबदारी संबंधित दुकानदारांची असेल. त्याकरता फूट मार्किंगसारखी व्यवस्था करावी.
- लोकांनी जवळच्या मार्केटमध्ये शक्यतो चालत किंवा सायकलवर जाऊन खरेदी करावी.
- सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यास ते दुकान/मार्केट तत्काळ बंद करण्यात येईल.
- जीवनाश्यक बाबींसंदर्भात वाहनांमध्ये खालील पद्धतीने लोकांची ने-आण करता येईल (टॅक्सी तसेच कॅब- 1+2, रिक्षा-1+2, चारचाकी- 1+2, दुचाकी- केवळ एका व्यक्तीला जाण्यायेण्याची परवानगी )