नागपूरIndian women climbers :माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला पद्मभूषण बचेंद्री पाल यांच्या नेतृत्वात १३ भारतीय साहसी महिलांच्या पथकानं अरुणाचल प्रदेशातील गोरिचेन ग्लेशियरवर १६ हजार ५०० फूट चढाई केली. या पथकात ५० ते ८५ वयोगटातील गिर्यारोहक महिला असून नागपूरच्या गिर्यारोहक बिमला देऊस्कर यांचा देखील समावेश आहे. टाटा स्टील अडव्हेंचर फाऊंडेशनने आर्मी अडव्हेंचर आणि इन्क्रेडिबल इंडिया डेस्टिनेशन अरुणाचल प्रदेश यांच्या सहकार्याने 'समिट्स अँड स्टीअरिंग व्हील' या नावाने ही मोहीम आखली गेली होती. यात ५० ते ८५ वयोगटातील गिर्यारोहक महिला सहभागी झाल्या होत्या. पद्मश्री बचेंद्री पाल यांच्यासह पद्मश्री चंद्रप्रभा ऐतवाल (८२), वसुमती श्रीनिवासन (७०), बिमला देऊस्कर (५६), मेजर कृष्णा दुबे (५७), गंगोत्री इंदुमती (६४), पायो मुर्मू (५५), कमांडंट सीमा टोलिया (५२), एल. अन्नपूर्णा (५३), सुषमा बिसा (५७), आशा तोमर (६७), मीनाक्षी पोपाली (६७) आणि शिल्पा (६१) यांचा समावेश होता.
अपघातातून बरं झाल्यानंतर मोहिम फत्ते :प्रसिद्ध गिर्यारोहक आणि १४ एव्हरेस्ट गिर्यारोहकांना प्रशिक्षण देणाऱ्या राष्ट्रीय साहसी पुरस्कार प्राप्त बिमला देऊस्कर यांनी मागील वर्षी ट्रान्स हिमालयन ट्रेकमध्ये सहभाग घेतला होता. त्यात बिमला यांना अपघात झाला व हिप बोन फ्रॅक्चर झालं होतं. त्यांच्यावर डॉ. निर्भय करंदीकर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. त्यातून बऱ्या होत बिमला यांनी या मोहिमेत अतिशय हिंमतीनं आणि आत्मविश्वासानं सहभागी होत, ही मोहीम देखील फत्ते केली.