नागपूर -नागपुरात आटोक्यात आलेला कोरोना आता मात्र वेगाने वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत नागरिकांना दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची सूट देण्यात आली. मात्र, नागरिक स्वतःच्या सुरक्षेसंदर्भात दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करत नसल्याने कोरोनाचा प्रसार होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे, म्हणूनच राज्याच्या इतर महानगरांप्रमाणेच पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापुढेही जर अशीच परिस्थिती राहिली तर नागपुरात पुन्हा ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.
बऱ्याच दिवसांनी महानगरपालिका आयुक्तांनी नागपुरातील कोरोनाच्या परिस्थितीवर एका व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी कोरोनासंदर्भात नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्याने नाराजी व्यक्त व्यक्त केली आहे. नागरिकांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठरवून देण्यात आलेल्या दिशानिर्देशांचे पालन होत नाही, हे गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत झालेल्या वाढीने सिद्ध केले आहे.
नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळला होता. त्यानंतरच्या चार महिन्यात रुग्णांची शहरातील संख्या १ हजार ७८९ इतकी आहे. तर जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा हा २२०० च्या पुढे निघून गेला आहे. ही संख्या गेल्या दीड महिन्यात झपाट्याने वाढली. राज्य शासनाने १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत ‘मिशन बिगीन अगेन’ सुरु केले. याअंतर्गत काही बंधने पाळून आणि दिशानिर्देशांचे पालन करून नागरिकांना आपले दैनंदिन व्यवहार करण्याची मुभा दिली. त्यावेळी सुद्धा जर आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडूच नये, असेही राज्य शासनाने म्हटले होते. मात्र, राज्य शासन आणि स्थानिक पातळीवर महानगरपालिकेने दिलेल्या दिशानिर्देशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. असेही मुंढे म्हणाले.
३१ मेपर्यंत नागपुरात रुग्ण संख्या ही केवळ ५०० च्या आत होती. मात्र, आज ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ७०० च्या पुढे गेली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृह नवा हॉटस्पॉट बनला आहे. कारागृहातील ५०० कैद्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी सुमारे ३०० कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. अजून सुमारे १ हजार २०० जणांची चाचणी व्हायची आहे. त्यातून मोठा आकडा समोर येण्याची शक्यता आहे. आता नवे हॉटस्पॉट टाळायचे असतील, रुग्णसंख्येवर आळा घालायचा असेल तर शासन दिशानिर्देशांच्या पालन करण्यासोबतच स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. त्यामुळे स्वयंशिस्त की संचारबंदी हा निर्णय नागरिकांना घ्यायचा आहे. स्वयंशिस्तीतून शासन, प्रशासनाच्या दिशानिर्देशांचे पालन केले नाही तर पुन्हा संचारबंदीसारखा कठोर निर्णय प्रशासनाला घ्यावा लागणार असल्याचे मुंढे म्हणाले.