नागपूर -दारूचे व्यसन पूर्ण करण्यासाठी घरातील सर्व वस्तूंची परस्पर विक्री करून झाल्यानंतर पैशासाठी बायकोला त्रास देणाऱ्या पतीची पत्नीने निर्घृण हत्या केली. शहरातील अजनी जयवंत नगरात ही घटना घडली. महेश पोरंडवार असे मृत पतीचे नाव असून ममता पोरंडवार असे आरोपी पत्नीचे नाव आहे.
खून करून 'ती' गेली पोलीस ठाण्यात हेही वाचा-'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणारच नसेल तर, 'करून दाखवलं' होर्डिंग लावले कशाला'
काही महिन्यांपूर्वी महेश हा त्याची पत्नी ममतासोबत जयवंतनगर येथील घरात राहत होता. तो अगोदर ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होता. त्याची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. दरम्यान, त्याला दारूचे व्यसन जडले. नंतर त्याची आर्थिक परिस्थिती कमकूवत झाली. त्यातूनच त्याने घरातील सर्व सामान विकून स्वतः शौक पूर्ण केला. त्यानंतर तो पत्नीपासून विभक्त राहत होता.
दारुचे व्यसन पूर्ण करण्यासाठी त्याने प्लॉट विक्रीसाठी काढला. हे समजताच ममता त्याला समजावण्यासाठी घरी गेली. दोघात भांडण झाले. भांडणादरम्यान ममताने हातोडीने महेशच्या डोक्यावर वार करून त्याची हत्या केली. या घटनेनंतर ममताने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन नवऱ्याचा खून केल्याची कबुली दिली. ममताच्या माहिती वरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महेशचा मृतदेह ताब्यात घेऊन तिला कायदेशीर अटक केली आहे. दरम्यान ,महेशचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक सबंध असल्याची माहितीही ममताने पोलिसांना दिली.