नागपूर - निकृष्ट जेवण आणि नाश्ताच्या विरोधात नागपुरातील दीक्षाभूमीजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आले आहे. जोपर्यंत मेसमधील ठेकेदार बदलला जाणार नाही, तोपर्यंत जेवण करणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान घेतली होती. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या नाश्ता आणि जेवणाच्या प्रमाणात कात्री(कमी पुरवठा) लावण्याचे काम मेसमधील ठेकेदार करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह समाज कल्याण विभागाच्या अधिपत्याखाली येत असून या वसतिगृहात एकूण १५० विद्यार्थी राहतात. या १५० विद्यार्थ्यांसाठी केवळ १२ लिटर दूध मागवले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांना दिले जात असलेल्या दुधामध्ये पाण्याचे प्रमाणच सर्वाधिक असल्याचे देखील विद्यार्थी म्हणाले. यासोबतच जेवणाची गुणवत्ता देखील अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याने आरोग्यावर विपरीत परिमाण होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.