नागपूर : विदर्भातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी जेईई पुढे ढकलण्यात यावी या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने ही मागणी अमान्य करत, विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणींसंदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)शी संपर्क साधावा अशा सूचना न्यायालयाने दिल्या.
आजपासून जेईई-मेन्स परीक्षा सुरू होत आहे. परीक्षा सुरू होण्याच्या अर्ध्या तासापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात सुनावणी पार पडली. विदर्भातील पूरग्रस्त भागांमधील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेता, ही परीक्षा पुढे ढकलावी अशी याचिका एका नागरिकाने दाखल केली होती. त्याबाबत ही विशेष सुनावणी पार पडली.