महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ - वाठोडा

नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एनएमआरडीए) 4 हजारापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 4,345 घरे बांधण्यात येत आहेत.

पंतप्रधान आवास योजना

By

Published : May 7, 2019, 10:08 AM IST

नागपूर- स्वस्त घरांसाठी 4 हजारापेक्षा अधिक अर्ज नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एनएमआरडीए) प्राप्त झाले आहेत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 4,345 घरे बांधण्यात येत असून, अधिकाधिक नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहभागी होता यावे, यासाठी ही मुदत आता आणखी एक महिन्याने वाढविण्यात आल्याचे नागपूर सुधार प्रन्यासच्या सूत्रांनी सांगितले.


प्रत्येकाला घर मिळावे, यासाठी शासनाकडून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत स्वस्त घर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. एका घरकुलाचे क्षेत्र सुमारे 320 चौरस फूट आहे. नागपुरात मौजा वाठोडा, तरोडी (खुर्द) मौजा वांजरी, वाठोडा या भागात स्वस्त घरे बांधण्यात येत आहेत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 4,345 घरे बांधण्यात येत आहेत. डिसेंबर 2019 पर्यंत ही घरे पूर्ण बांधण्याचे उद्दिष्ट नासुप्रकडून ठेवण्यात आले आहे. यातील निम्म्याहून अधिक घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.


ऑनलाईन करा अर्ज -


प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना स्वत:च्या हक्काची घरे मिळावीत, यासाठी नासुप्र व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण शहरातील विविध भागात घरकूल निर्मितीचे प्रकल्प राबवत आहेत. एनएमआरडीएतर्फे लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागपूर महापालिकेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनासुद्धा पुन्हा संकेतस्थळी अर्ज करण्याच्या सूचना नासुप्रकडून करण्यात आल्या आहेत. नासुप्रच्या विभागीय कार्यालयातही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे नासुप्रकडून सांगण्यात आले.


आवश्यक कागदपत्रे -


अर्जदाराचा स्वत:चा पासपोर्ट फोटो, आधार कार्ड आणि स्वत:चे बँक खाते असलेल्या बँकेचा कॅन्सल चेक अनिवार्य आहे. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर स्वत:चे पक्के घर नसल्याचे शपथपत्र, 10 हजार रुपये अनामत रक्कम (बुकिंग चार्जेस-ईएमडी) आणि आवेदन शुल्क (जीएसटीसह) 560 रुपये लाभार्थ्यांना द्यावे लागणार आहेत.


2.50 लाखांचे अनुदान


तरोडी या भागात 9 लाख 15 हजार रुपयात घर उपलब्ध होणार आहे. तर वांजरी या भागात याच घरांची किंमत 11 लाखांच्या घरात आहे. वाठोडा येथील घरांची किंमत 11 लाख 40 हजारांच्या घरात आहे. या घरांसाठी केंद्र सरकारकडून दीड लाख आणि राज्याकडून एक लाख रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक घरकुलामागे 2 लाख 50 हजार रुपये कमी होणार आहेत. मात्र उर्वरित रक्कम नागरिकांना भरावयाची आहे.

ऑनलाईन अर्जाची मुदत - 6 जून 2019
स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी- 15 जून 2019
स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी - 20 जून 2019
सोडतीचा दिनांक व स्थळ - 26 जून 2019, सुरेश भट सभागृह येथे सकाळी 11 वाजता

ABOUT THE AUTHOR

...view details