नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नागपूर शहरातील धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जयेश कांथा नामक एका कुख्यात गुंडाचा सहभाग आढळून आला असून तो बेळगाव कारागृहात कैद आहे. त्याला 2016 मध्ये खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा झाली आहे. जयेश कांथावर कारागृहातुन पळून जाण्याचा गुन्हा दाखल असून खंडणी मगितल्याचा जुना रेकॉर्ड आहे.
पोलिसांचे पथक बेळगावला रवाना : नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगावला पोहचले आहे. नागपूर पोलिसांनी आरोपीकडून डायरी जप्त केली आहे, त्यात कोणाचे नंबर आहे याचा तपास सुरू आहे. ज्या मोबाईलवरून धमकीचे कॉल आले तो मोबाईल कारागृहात असल्याने त्या संदर्भात बेळगावात गुन्हा दाखल केला जाणार आहे. तपास सध्या प्राथमिक पातळीवर आहे, आरोपीला फाशीची शिक्षा भोगत असल्याने कायदेशीर प्रक्रिया करून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
संपर्क कार्यालयात धमकीचा फोन : नितीन गडकरी यांचे नागपूरातील खामल्यात जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात फोन आला. त्या फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे सांगून नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि काही सेकंदातच त्याने फोन कट केला. फोन घेणाऱ्याने लगचे भारतीय जनता पक्षातील वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. अर्ध्या तासातच गडकरी यांच्या संपर्क कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. तसेच, दहशतवाद विरोधी पथक आणि नक्षलवाद विरोधी अभियानाचे पथकासह अन्य यंत्रणा सतर्क झाली आहे.