नागपूर- मँच मेकिंग या लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून नागपुरात एका प्राध्यापिका महिलेने सहा जणांना फसवल्याचे उघड झाले आहे. सहा लग्न करून पतींकडून लाखो रुपये उकळणाऱ्या या महिलेविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या टोळीत गुंड, डॉक्टर आणि राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. समीरा उर्फ सीमा मुक्तार अहमद अन्सारी असे या आरोपी महिलेचे नाव आहे. ती नागपूरच्या मोमीनपुरा येथील इस्लामिया हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका आहे.
यापूर्वी समीराचं 2010 मध्ये भिवंडी येथील इमरान अन्सारीसोबत लग्न झाले होते. समीराला त्याच्यापासून 8 वर्षांचा एक मुलगा आहे. इमरानसोबत तिचे न पटल्याने त्याने तिला घटस्फोट दिला. त्यानंतर तिने 16 एप्रिल 2013 ला यशोधरानगर येथील नजमून शाकीब याच्याशी लग्न केले. काही दिवसातच तिने नजमूनला सोडले. त्यानंतर शादी डॉटकॉमवर तिची ओळख औरंगाबाद येथील मुदस्सर मोमीन याच्याशी झाली. 3 सप्टेंबर 2017 ला दोघांनीही लग्न केले. मुदस्सर हा औरंगाबाद येथे टीव्ही मॅकनिक होता. लग्न करण्यापूर्वीच तिने मुद्दस्सरला नागपूरला बोलावून घेतले. वास्तविक पाहता समीराचं हे पाचवे लग्न होते. मात्र, तिने दुसरे लग्न असल्याचे सांगून मुद्दस्सरसोबत लग्न केले होते.