नागपूर- नरखेड तालुक्यातील मदना गावातील वृद्ध शेतकरी गोपाळ जाणे यांनीस्वतःचेच सरण रचून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आजारपण आणि आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. नरखेड पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला आहे.
नागपुरात स्वःताचेच सरण रचून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या - शेतकरी
घटनास्थळी ज्या पद्धतीने लाकडे रचून असल्याचे दिसून आले त्यावरून गोपाळराव जाणे यांनी स्वतःचीच चिता रचून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८५ वर्षीय वृद्ध शेतकरी गोपाळराव जाणे यांना किडनीचा आजार झाला होता. आर्थिक परिस्थिती बेताची असताना उपचारावर खर्च करणे शक्य नसताना मुलाला सुद्धा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यामुळे गोपाळराव जाणे पुरते खचले होते. त्यातही तीन नातींपैकी एकीचे लग्न कसेबसे आटोपले. मात्र, दोन नाती लग्नाच्या असल्याने त्यांचे लग्न आणि मुलाच्या कर्करोगावर उपचार कसा करायचा, या आर्थिक विवंचनेतून गोपाळराव जाणे यांनी स्वतःचेच सरण रचून आत्महत्या केली.
रात्रभर गोपाळराव शेतातून घरी परत आले नसल्याने त्यांच्या मुलाने त्यांचा शोध घेतला. शेतातच त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी ज्या पद्धतीने लाकडे रचून असल्याचे दिसून आले त्यावरून गोपाळराव जाणे यांनी स्वतःचीच चिता रचून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. नरखेड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठले आणि अर्धवट जळालेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून तपास सुरू केला आहे.