महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 13, 2021, 12:19 AM IST

ETV Bharat / state

नागपूर : कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्हा कृतीदल स्थापन

कोरोनामुळे आई आणि वडील गमावलेल्या बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी कृतीदल (टास्क फोर्स) तयार करण्यात आला आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची संपूर्ण जबाबदारी या कृती दलामार्फत घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

district task force for children whos parent died due to corona
नागपूर : कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्हा कृतीदल स्थापन

नागपूर -कोरोनाबाधित व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावरही गंभीर परिणाम होत आहेत. कोरोनामुळे आई आणि वडील गमावलेल्या बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी कृतीदल (टास्क फोर्स) तयार करण्यात आला आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची संपूर्ण जबाबदारी या कृती दलामार्फत घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर अशा बालकांची काळजी व संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कृती दलाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर समिती गठीत -

कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्यानंतर निराधार झालेल्या बालकांची माहिती जनतेने द्यावी. जिल्हा प्रशासनाला तत्काळ कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. अशा बालकांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी जिल्हा कृती दलामार्फत घेण्यात येणार आहे. अशा निराधार बालकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्यायहक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. जिल्हा कृती दलाच्या माध्यमातून अशा बालकांच्या संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा वेळोवेळी घेण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग झाल्यामुळे विलगीकरणात राहत असलेल्या तसेच दवाखान्यात दाखल केल्यामुळे बालकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच अशा बालकांच्या पालकांचा मृत्यू झाल्यामुळे संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. अशा बालकांसाठी एक शिशुगृह तसेच 18 वर्षापर्यंतच्या बालकांसाठी एक बालगृह निश्चित करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती कोविड हॉस्पिटल व मदत केंद्रांनासुध्दा उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे मदत उपलब्ध करुन देणे सुलभ झाले आहे. अडचणीत सापडलेल्या पालकांबाबत संबंधित रुग्णालयाने तत्काळ माहिती कळवावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

समुपदेशनाची व्यवस्था करण्यात येईल-

महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त व जिल्हा प्रशासन संरक्षणासोबतच समुपदेशनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता असल्यास अशा बालकास बालगृहामध्ये दाखल करुन घेण्यात येणार आहे. यासाठी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 यावर सुध्दा संपर्क साधता येईल. कोविडच्या पार्श्वभूमीवर कार्यरत असणारे बालगृहे, निरीक्षण गृहे यांच्यामार्फत तत्काळ उपचार पुरविण्यात येणार असून यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथकसुध्दा नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दिली.

अनाथ मुलांची माहिती तत्काळ कळवा -

कोरोनामुळे आई आणि वडील असे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत जिल्हा कृतीदल स्थापन करण्यात आला आहे. अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार अथवा तस्करीसारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी अशा बालकांची माहिती नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला कळवावी. अशा बालकांचे आर्थिक व मालमत्ताविषयक हक्क अबाधित राहतील, यासाठी दक्षता बाळगण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. या संदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या 0712-256991 यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाप्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा - पितृशोक झालेल्या 'तारक मेहता..' फेम भव्या गांधीच्या कुटुंबावर दुःखाचे संकट

ABOUT THE AUTHOR

...view details