नागपूर - महाराष्ट्र विधानसभेत नव्याने निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी काल (बुधवारी) पार पडला. या शपथविधीत नागपूर पश्चिमचे काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्या शपथ विधी नागपूर व विदर्भातील नागरिकांसाठी लक्षणीय ठरला. विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर आमदार विकास ठाकरेंनी जय विदर्भ असा जयघोष केला.
हेही वाचा-खासगीकरणाची प्रक्रिया अयशस्वी ठरली तर एअर इंडिया बंद होणार
आमदारकीच्या शपथेचा शेवट विकास ठाकरे यांनी 'जय विदर्भ' या घोषणेने केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी नागपूर शहर काँग्रेस समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी श्रीहरी अणे यांनी काँग्रेस नेत्यांना स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा सोडू नये अशी सूचनाही केली होती.
स्वतंत्र विदर्भाच्या नावावर काँग्रेसला वैदर्भीय जनता कधीकाळी भरभरून मतदान करायचे ज्यामुळे विदर्भात काँग्रेसचे बहुसंख्य आमदार निवडणून येत. परंतु, स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा भाजपने हाती घेतला ज्यानंतर गेल्या निवडणुकीत विदर्भातील ६२ पैकी तब्बल ४४ आमदार निवडून आले. कालांतराने भाजपने स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा बाजूला ठेवला. ज्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला विदर्भात १५ जागांचे नुकसान झाले. त्यामुळे काँग्रेसने पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा हाती घेतला की, काय अशीही चर्चा विकास ठाकरे यांच्या शपथ विधीच्या निमित्ताने सुरू झाली आहे.