नागपूर- उपराजधानी नागपुरात कोरोना मृत्यूंची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. सुरूवातीच्या ३ महिन्याच्या काळात राज्यात सर्वात कमी कोरोना मृत्यूदर हा नागपूरचा होता. हा मृत्यूदर आता साडेतीन टक्क्यांपर्यंत गेला आहे. प्रत्येक दिवशी मृत्यूचा आकडा हा ५० पर्यंत जात असल्याने प्रशासनाची चिंता देखील वाढली आहे. या संदर्भात प्रशासनाकडून आढावा घेण्यात आला, तेव्हा ८० टक्के मृत्यू हे अंतिम वेळेवर उपचारासाठी दाखल होत असलेल्या रुग्णांचा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
गेल्या २ महिन्यांपासून नागपूर शहरात कोरोना विषाणूचा मोठा उद्रेक झाला आहे. आजवर रुग्ण संख्या ही ५४ हजाराच्या पुढे गेली आहे, तर मृत्यूचा आकडा हा सातराशेच्या घरात आहे. ऑगस्ट महिन्यात तब्बल ९१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, नागपुरातील कोरोनाची स्थिती किती भीषण आहे याचा अंदाज येतो. दर दिवसाला मृत्यूचा आकडा वाढतच असल्याने महापालिकेने आता 'डेली डेथ अनालिसिस' करायला सुरुवात केली आहे. यात कोरोनाची लक्षणे असताना देखील नागरिक ते लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याचे समजले आहे.