नागपूर - कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हळूहळू सर्व पूर्वपदावर येत आहे. मात्र, अशातच राजकीय कार्यक्रमांना होत असलेली गर्दी कोरोनाला पुन्हा आमंत्रण देणारी ठरत आहे. नागपूरात सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची चांगलीच धूम आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांची उसळलेली गर्दी पाहता राजकीय नेत्यांसाठी कोरोना संपलाय का, असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहे.
सब झुठ है-
एकीकडे कोरोनापासून बचावासाठी भरभरून बोलायचे आणि दुसरीकडे स्वतःच मात्र गर्दी करत कोरोनाबाबतच्या नियमांना पायदळी तुडवायचे. अशीच काहीशी स्थिती विविध राजकीय पक्षांनी निर्माण केल्याचे दिसून येत आहे. सध्या नागपूरात पदवीधर निवडणुकीची धूम आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी काँग्रेसकडून अभिजीत वंजारी, तर भाजपाकडून महापौर संदिप जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते प्रामुख्याने उपस्थित होते. मात्र, याच कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांची उसळलेली गर्दी राजकीय नेत्यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंग असेल वा मास्क या नियमांना धाब्यावर बसल्याचे पहायला मिळाले. दोन्ही राजकीय पक्ष सध्या सत्तेत आहे. भाजपचे पदवीधर उमेदवार संदिप जोशी, तर नागपूरचे महापौर आहेत. त्यामुळे आजवर कोरोना बाबत लोकांना ज्ञान देणाऱ्या महापौरांच्याच कार्यक्रमात उसळलेली गर्दी पाहता 'सब झुठ है' अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहे.