नागपूर - निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात 2 गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी, नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना 20 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 2014 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी 2 गुन्हे लपवल्याचा आरोप नागपुरातील वकील सतीश उके यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती.
देवेंद्र फडणवीसांना कोर्टाचा चौथ्यांदा दिलासा, 20 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश - फडणवीसांना २० फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात 2 गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी, नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना 20 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाची सुनावणी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. यापूर्वी 3 वेळा फडणवीस यांना न्यायालयात व्यक्तिगत उपस्थित राहण्यापासून विविध कारणास्तव न्यायालयाने सूट दिली होती. परंतू, आज (सोमवार) चौथ्यांदा न्यायालयाने फडणवीस यांना स्वतः उपस्थित राहण्यापासून सूट देत ही शेवटची संधी असल्याचाही उल्लेख केला. विधिमंडळाचे आगामी अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची आज मुंबईत बैठक होती. विरोधी पक्षनेते असल्याने फडणवीसांचे या बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक होते. त्यामुळे फडणवीस आज न्यायालयात उपस्थित राहू शकत नसल्याचे कारण फडणवीसांच्या वकिलांनी दिले होते. वकिलांनी दिलेले कारण न्यायालयाने मान्य केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 फेब्रुवारीला निश्चित करण्यात आली आहे.