संभाजी भिडेंबाबत देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जन माणसांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या वक्तव्यानंतर काँग्रेससह राज्यातील सर्वच पक्ष आक्रमक झाले आहेत.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस -संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य केले आहे, त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्य इतिहासाचे एक महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आणि महानायकाबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणे पूर्णपणे अनुचित आहे. माझे स्पष्ट मत आहे की, अशा प्रकारचे वक्तव्य भिडे गुरुजींनी किंवा कोणीच करू नये. अशा वक्तव्यामुळे लोकांमध्ये संताप तयार होतो. महात्मा गांधींच्या विरुद्ध असे बोललेले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही आणि यासंदर्भात जी उचित कारवाई करायची आहे ती राज्य सरकार करेल.
संभाजी भिडेंचा भाजपसोबत संबंध नाही :महात्मा गांधी असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असो, कोणाच्याही विरुद्ध बोललेले आम्ही खपवून घेणार नाही. संभाजी भिडे यांचा भाजपसोबत काहीच संबंध नाही. ते त्यांची स्वतःची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचे काही कारण नाही.
सावरकरांचा अपमान राहुल गांधी करतात तेव्हा: महात्मा गांधी यांच्या विरुद्ध कुणी बोलल्यानंतर निषेध करत काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरतात. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अतिशय गलिच्छ भाषा ज्या वेळेस राहुल गांधी बोलतात त्याचाही निषेध त्यांनी केला पाहिजे; पण ते त्यावेळी मात्र काँग्रेसचे लोक मिंदे होतात. कुठल्याही परिस्थितीमध्ये महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
संभाजी भिडे महात्मा गांधींबद्दल काय म्हणाले होते?संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांचे वडिल मुस्लिम होते असे वक्तव्य केले आहे. त्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. तसेच राजकीय वर्तुळात देखील भिडे गुरुजींच्या या वक्तव्यामुळे दावे प्रतिदाव्यांचे सत्र सुरू आहे. त्यामुळे आता भिडे गुरुजींवर सरकार कोणती कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा:
- Prithviraj Chavan Threat Email : पृथ्वीराज चव्हाणांना धमकीचा ईमेल; संभाजी भिडेंच्या अटकेची केली होती मागणी
- Sambhaji Bhide Controversial Statement: संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे यवतमाळमध्ये विविध संघटना आक्रमक; उतरल्या रस्त्यावर
- Yashomati Thakur On Bhide : संभाजी भिडेंना रविवारपर्यंत अटक करा; अन्यथा...; यशोमती ठाकूर यांचा शासनाला इशारा