नागपूर DCM Devendra Fadnvis on OBC Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यातील आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटीलांनी अनेक दिवस उपोषण केलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण मागं घेतलंय. मात्र, नागपूर आणि चंद्रपुरात मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी कुणबी समाजाचे प्रतिनिधी उपोषणाला बसले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या उपोषणकर्त्यानां उपोषण सोडण्याचं आवाहन केलंय. यावेळी त्यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेटही घेतली.
ओबीसी आरक्षणात कोणालाही वाटेकरी होऊ देणार नाही : नागपूर विमानतळावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारची भूमिका अगदी स्पष्ट आहे. ओबीसी आरक्षणाला कुठेही आम्ही धक्का लागू देणार नाही, कुठेही ते कमी देखील होऊ देणार नाही. तसंच कोणाला नव्याने त्यात वाटेकरी होऊ देणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. ओबीसी समाज बांधवांना आमची विनंती आहे की, त्यांनी जे आंदोलन सुरू केलंय, ते मागं घ्यावं. कुठल्याही प्रकारचं आंदोलन करु नये. संभाजीनगरातही जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलकांनाही मी स्वतः विनंती केलीय. माझा विश्वास आहे की, ते उपोषण संपवतील. यामुळे नागपूर व चंद्रपूर येथील आंदोलकांना आमची विनंती आहे की त्यांनीही उपोषणाची सांगता करावी. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या आंदोलकांची भेट घेत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केलीय.