मुंबई Ajit Pawar News : कुख्यात गॅंगस्टार शरद मोहोळ याच्या हत्येनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका होत आहे. यावर राज्यातील कायदा व सुव्यवस्था कोणी बिघडण्याचा काम करत असेल तर सरकार ते खपवून घेणार नाही, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलीय. ते मुंबईत रविवारी माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जरांगे पाटलांना टोला : मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात रान उठवलंय. आरक्षणावरुन ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध थांबायला तयार नाही. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशाप्रकारचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा नेत्यांची कामं करत नाही, मराठा समाजावर अन्याय करत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला होता. याला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "मला माझं माहित आहे की, मी काय काम करतो. मला दुसऱ्यानं पावती देण्याची गरज नाही. गेली 32 वर्षे झाले मी काम करतो." सर्व धर्मांची मी कामं करत असल्याचे म्हणत अजित पवारांनी जरांगे पाटलांना टोला लगावलाय.
राज ठाकरेंना प्रत्युत्तर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सागरी सेतूवरुन राज्य सरकारवर टीका केली. यावर अजित पवार म्हणाले की, "समृध्दी महामार्ग महामार्गावरून फायदा झाला. एक्स्प्रेस वे फायदा झाला आहेत. यातून वेळेची बचत होते. पेट्रोलचीही बचत होते. तसंच या सेतूमुळं वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे."