नागपूर - शहरातील कुख्यात गुंड सय्यद मोबिन अहमद याने पोलिसांच्या गाडीत बसून टिक-टॉक व्हिडिओ तयार केला आहे. त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावरदेखील शेअर केला. त्यामुळे सध्या नागपुरात या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मात्र, खळबळ उडाली आहे.
पोलीस व्हॅनमध्ये कुख्यात गुंडाने बनवला टिक-टॉक व्हिडिओ, पोलीस दलात खळबळ
नागपूरमधील कुख्यात गुंडाने पोलीस व्हॅनमध्ये टिक-टॉक व्हिडिओ बनवला. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर बघता त्याच्यावर दोन महिन्यांपूर्वी तडीपारची कारवाई करण्यात आली होती. मात्र, तरीही त्याने पोलीस ठाण्याच्या बाहेरील पोलीस गाडीत टिक-टॉक व्हिडिओ तयार केला. नागपुरातील गुंडाची पोलिसांसोबत असलेली दोस्ती नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. एरवी ही दोस्ती गुपचूप पद्धतीने निभावली जायची. मात्र, आता थेट या दोस्तीचे लाभार्थी असलेले गुंड पोलिसांच्या गाडीचा उपयोग करून दहशत माजवू बघत आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीवर शासकीय वाहनाचा गैरप्रकार केल्याप्रकरणी कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या व्हिडिओत गुंड सैयदला मोबाईल कसा वापरता आला? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच त्याला पोलिसांनी गाडी कुणाच्या परवानगीने वापरायला दिली. या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना द्यावी लागणार आहे. मात्र, पोलीस विभागाने सध्या या प्रकरणावर हाताची घडी तोंडावर बोट, अशी भूमिका घेतली आहे.