नागपूर- वन्यजीव आणि वाघ संरक्षणाचा संदेश घेऊन जनजागृती करण्यासाठी एक दाम्पत्य तब्बल ४० हजार किलोमीटरची देश भ्रमंती करून महाराष्ट्रात पोहोचले आहे. कोलकात्याहून निघालेले हे वन्यजीवप्रेमी दाम्पत्य शनिवारी नागपुरात दाखल झाले. रतींद्रनाथ दास आणि त्यांची पत्नी गीतांजली दास अशी त्यांची नावे आहेत.
रतींद्रनाथ दास आणि त्यांची पत्नी गीतांजली यांनी सांगितले की, पश्चिम बंगालहून १५ फेब्रुवारीला सुरू झालेली त्यांची यात्रा समाधानकारक राहिली. या यात्रेदरम्यान त्यांना अनेक लोक भेटले. भेटलेल्या लोकांनी त्यांचे आदरपुर्वक स्वागत केले. पण, मध्य प्रदेशच्या एका गावात त्यांना चुकून लहान मुले चोरणारे समजले गेल्याचाही अनुभव त्यांनी सांगितला.
वन्यजीव संरक्षक रतींद्रनाथ (43) म्हणले की, ‘‘आम्ही मध्य प्रदेशच्या होशंगाबाद मधील सतपुरा व्याघ्र अभयारण्यात जात होतो. रस्त्यात आम्ही एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबलो होतो. एक शाळकरी मुलाने आम्हाला चोर समजले. त्या मुलाने हे जाऊन गावातील लोकंना सांगितले. सुरुवातीला आम्ही घाबरलो, पण आम्ही त्यांना आमचा उद्देश समजावून सांगण्यात सफल झालो. यानंतर झाल्याप्रकाराबद्दल त्यांनी आमची माफी मागितली आणि आम्हाला संपूर्ण सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.
‘‘ही यात्रा वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जनजागृती व्हावी आणि वाघांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली जावीत यासाठी सुरू करण्यात आली आहे. आम्ही संपूर्ण देशातील आरक्षित वनांचा दौरा करत आहोत. यासंदर्भात लोकांशी बोलत आहोत. आम्ही आत्तापर्यंत २२ राज्यात जाऊन आलो आहोत. महाराष्ट्रानंतर आमची योजना गोवा आणि दक्षिणेमध्ये जाण्याची आहे.'' असेही त्यांनी सांगितले. त्यांची पुढची योजना पुढील वर्षी १२ मार्चपासून देशातील व्याघ्र संवर्धनासाठी राखीव अभयारण्यांची भटकंती करण्याची असणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.