नागपूर: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आशीष देशमुखांनी त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली होती. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी देशमुखांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावून निलंबित केले होते. आशिष देशमुख हे बावनकुळेंच्या भेटीला आल्याने नवीन राजकीय समीकरण उदयास येणार का? असे त्यांना विचारले असता ते म्हणाले की, बावनकुळे यांच्या निमंत्रणावर मी नाश्त्याला आलो आहे. यामागे कोणतीही राजकीय भूमिका नाही. काँग्रेस पक्ष सोडून आशिष देशमुख भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. यावर त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.
मला पक्षातून काढणार नाही:राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांनी ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी, अशा प्रकारचे वक्तव्य आशिष देशमुखांनी केले होते. याचबरोबर पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मी पक्षातून निलंबित असलो तरी पक्ष माझ्यावर बडतर्फीची कारवाई करणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
'या' ठिकाणांहून लढण्यास इच्छुक:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यातील हिंगणा किंवा काटोल या दोन मतदारसंघांपैकी एक काँग्रेसच्या वाट्याला आल्यास मी लढण्यास तयार असल्याचे देखमुख म्हणाले. यावेळी आशीष देशमुख यांच्या मतदारसंघात विकास कामे करून घेण्यासाठी त्यांनी माझी भेट घेतली, असे स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिले आहे. यामागे राजकीय हेतू नाही, असे देखील ते म्हणाले.