नागपूर- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब मतदान केले. नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः निवडणूक लढवत आहेत.
मतदान करणे हा संविधानाने सर्वांना दिलेला मूलभूत हक्क असल्याने प्रत्येक नागरिकाने या मतदान करून तो हक्क बजावला पाहिजे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. नागपूरची जनता नेहमीच विकास करणाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील जनता देखील विकासाच्या बाजूने मतदान करेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
मतदान केल्यानंतर फडणवीस कुटुंब मुलगा पुन्हा व्हावा, अशी सरीता फडणवीस यांची इच्छा
जास्तीत जास्त नागरीकांनी मतदान करण्यासाठी घराबाहेर पडण्याचे, आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदान करण्यासाठी आज नागपूरात आले होते. यावेळी पत्नी अमृता फडणवीस व आई सरिता फडणवीस या देखील आल्या सोबत होत्या. धरमपेठ परिसरातील महापालिका शाळेतील मतदान केंद्रात मुख्यमंत्री यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. एक आई म्हणून देवेंद्र हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा देखील यावेळी सरिता फडणवीस यांनी व्यक्त केली.
दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.
या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.