नागपूर- वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी छत्तीसगड येथे गेलेल्या मुलाच्या घरून चोरट्यांनी अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. महत्वाचे म्हणजे हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून इमामवाडा पोलिसांनी दोघांना या प्रकरणी अटकदेखील केली आहे. सुभाष मानके आणि कुणाल बिने, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सुरक्षा अलार्म वाजल्याने शेजाऱ्यांना मिळाली -
राहुल भगत हे मूळचे छत्तीसगडमधील रहिवासी आहेत. ३ एप्रिल रोजी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच ते सहकुटुंब आपल्या गावी गेले होते. राहुल भगत यांच्या घराला बऱ्याच दिवसांपासून कुलूप असल्याचे समजताच आरोपी सुभाष मानके आणि कुणाल बिने यांनी ३० एप्रिल रोजी भगत यांच्या घरात चोरी केली. मात्र, घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आल्याची कल्पना चोरट्यांना आलीच नाही. चोरी झाल्यानंतर भगत यांच्या घरी असलेले सुरक्षा अलार्म वाजत असल्याने शेजारच्यांनी या संदर्भात राहुल भगत यांना फोन करून सूचना दिली असता ते नागपूरला परत आले. तेव्हा घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले.