नागपूर - मोठ्या बहिणीने मोबाईल दिला नाही या रागातून १४ वर्षीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शहरातील जरीपटका परिसरात घडली आहे. नयन मगनाणी असे मृताचे नाव आहे. तो नवव्या वर्गात शिकत होता.
नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागनाणी कुटुंब राहते. मृत नयनची बहिण मोबाईलवर व्यस्त असताना तिच्या लहान भावाने तिच्याकडे मोबाईलची मागणी केली. तेव्हा तिने मोबाईल नकार दिल्याने दुखावलेल्या नयन याने घरातील वरच्या माळ्यावरील खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्याने त्याच्या बहिणीला मोबाईल न दिल्यास गळफास घेईल, अशी धमकी सुद्धा दिली होती. मात्र, नयन असे काहीही करणार नाही, असा तिला विश्वास होता. त्यानंतर अर्ध्या तासापेक्षाही जास्त वेळ झाल्यानंतर नयन खाली न आल्याने त्याच्या बहिणीने वरच्या खोलीत जाऊन बघितले. तेव्हा नयन गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.