नागपूर - प्रेमासाठी वाट्टेल ते करणारे प्रियकर भेटतील मात्र, प्रेमात चोरी करणाऱ्या प्रियकराची कहानी वेगळीच. नागपूर येथील मानकापूर पोलीस हद्दीतील एका प्रियकराने आपल्या प्रेयसीसाठी डॉक्टरच्या घरातील पार्शियन मांजर चोरली. तुम्ही म्हणाल मांजर, होय मांजरच, या मांजरीची किंमत तब्बल ३० हजार रुपये इतकी आहे.
प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रेयसीला आवडले पार्शियन मांजर, प्रियकराने थेट केली डॉक्टरच्या घरात चोरी - प्रेयसी
प्रेयसीला आवडलेली मांजर प्रियकराने चोरली.
डॉ. अंजुमन शाहिद यांचे मानकापूर पोलीस ठाणे हद्दीत निवासस्थान व रुग्णालय आहे. त्यांनी एक पार्शियन मांजर पाळलेले आहे. आरोपी नीलेशा बनसोड आजारी असल्यामुळे उपचाराकरता डॉ. शाहिद यांच्याकडे दवाखान्यात आली होती. त्यावेळी तिला ती मांजर दिसली आणि तिला ते मांजर आवडले. घरी परतल्यावर तिने तिच्या प्रियकर आरोपी हर्षल मानापुरे याला मांजरी बाबत सांगितले. तेव्हा आपल्या प्रेयसीची इच्छा पूर्ण करण्यासाठी हर्षलने मांजरीची चोरी करण्याचा बेत आखत मांजर चोरली.
जिवापाड प्रेम असलेले मांजर चोरीला गेल्याची तक्रार डॉ. शाहिद यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी डॉ. शाहिद यांच्या दवाखान्याबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा फुटेजवरून आरोपी प्रियकरास विचारपूस केली. त्याने मांजर चोरीची कबुली दिली. त्यांनतर प्रेयसीच्या घराची झडती घेण्यात आली व त्यांच्याकडून पोलिसांनी चोरी केलेली मांजर ताब्यात घेत डॉ. शाहिद यांना परत देण्यात आला.