नागपूर -एका दृष्टीहीन चिमुकलीने (blind girl Ishwari Pande ) आजचा प्रजासत्ताक दिवस अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. ईश्वरी पांडे नामक दृष्टिहीन 12 वर्षीय चिमुकलीने अंबाझरी तलावाच्या मध्यभागी जाऊन राष्ट्र ध्वज फडकावला आहे. ईश्वरीला जन्मापासूनच दृष्टी नाही. आपल्या देशाचे सौंदर्य ईश्वरीने कधीही बघितले नाही. केवळ स्वातंत्र्य लढाईच्या कथा कहाण्या ऐकून ईश्वरीने आपल्या मनात आपला देश शूरवीरांचा आहे, हे चित्र रंगवले आहे. म्हणून ईश्वरीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. देशावर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी याही वर्षी ईश्वरीने अंबाझरी तलावात तब्बल दोन किलोमीटर अंतर पोहून तलावाच्या मध्यभागी ध्वजारोहण करण्याची कामगिरी पार पडली.
आपला भारत जगातील सर्वात सुंदर देश आहे, असं कोणताही भारतीय सांगेल. जे जन्माने भारतीय आहेतआणि कर्माने सुद्धा भारतीय आहेत. त्यांच्याकरिता आजचा उत्सव किती महत्त्वाचा आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र, ज्यांनी आपला देश कधीही आपल्या डोळ्यांनी बघितलाच नाही. त्यांच्यासाठी आजच्या ऐतिहासिक दिवसाचे महत्व किती असेल याचं उत्तर दिलं आहे, नागपुरच्या १२ वर्षीय या चिमुकलीने. तब्बल अडीच तास पोहून ईश्वरीन अंबाझरी तलावाच्या अगदी मध्यभागी असलेल्या खांबावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळवला आहे.नागपुरकरांनी केले ईश्वरीचे स्वागत -ईश्वरी पांडे या चिमुकलीने आज समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिलेला आहे. जगातील डोळस व्यक्तींना जे जमलं नाही ते या चिमुकलीने करून दाखवलं आहे. सकाळीच्या वेळी तापमान 10 अंश सेल्सिअस होत. त्यामुळे तलावातील पाणी प्रचंड गार होत. आशावेळी ईश्वरीन प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली आहे. ज्यावेळी ती परत आली तेव्हा तलावावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाने ईश्वरीचे टाळ्या वाजवून स्वागत केले.