नागपूर BJP Women Leader Murder Case :नागपूरमधील भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक महिला नेत्याच्या हत्येला बराच कालावधी लोटला आहे. मात्र या महिला नेत्याचा मृतदेह अद्याप मिळाला नाही. मध्यंतरी मध्यप्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील विहिरीत एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. तो मृतदेह या भाजपा नेत्याचा असावा, असा संशय नागपूर पोलिसांना होता. त्यासाठी पोलिसांनी या मृतदेहाची डीएनए चाचणी केली. आता डीएनए चाचणीचा रिपोर्ट समोर आला असून, तो मृतदेह त्या महिला नेत्याचा नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
हत्या झाल्याचा पुरावा मिळाला होता : मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये या महिला नेत्याची हत्या झाल्याचा पुरावा पोलिसांना मिळाला होता. ज्या घरात त्यांची हत्या झाली, त्या ठिकाणी सोफ्याच्या फोममध्ये पोलिसांना रक्ताचे डाग सापडले होते. हे रक्त त्या महिला नेत्याचंंच असल्याचं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं होतं. हत्येच्या दिवशी आरोपीनं या महिलेचा मृतदेह घराच्या कार्पेटखाली लपवून ठेवला होता. एका प्रत्यक्षदर्शीनं तो मृतदेह पाहिला असल्याची साक्ष पोलिसांना दिली आहे. या शिवाय आरोपीच्या नोकरानंही आरोपीच्या कारच्या डिक्कीत रक्त पाहिल्याची साक्ष पोलिसांना दिली आहे. अशाप्रकारे पोलिसांकडं आरोपी विरोधात भक्कम पुरावे आहेत.