नागपूर Sunil Kedar : नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक १५२ कोटींच्या रोखे (शेअर्स) घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जामीन मंजूर केला. आज त्यांची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. यावेळी सुनील केदार समर्थकांनी नागपूर मध्यवर्ती कारागृहाबाहेर प्रचंड गर्दी करत त्यांचं जोरदार स्वागत केलं. एकीकडं कारागृह प्रशासनाने कारागृहाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, मिरवणूक काढू नये अशा सूचना देत नोटीस बजावली होती. तरी देखील सुनील केदार यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या आदेशाला धुडकवत भव्य रॅली काढली. एकप्रकारे सुनील केदार यांनी कारागृहाबाहेर येताच आपल्या राजकीय शक्तीचं प्रदर्शन केलं आहे.
५ वर्षांची सुनावली होती शिक्षा : २२ डिसेंबरला नागपूरच्या कनिष्ठ न्यायालयाने सुनील केदार यांना बँक घोटाळा प्रकरणी दोषी ठरवलं होतं. १५२ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सुनील केदार यांनी जामीन मिळावा आणि शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज केला होता. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सुनील केदार यांना जामीन देण्यास आणि शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळं सुनील केदार यांनी वकिलामार्फत उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली होती. मंगळवारी अखेर त्यांना एक लाख रुपयांच्या जात-मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
कारागृहाबाहेर गर्दी करू नका : सुनील केदार यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज केदार यांची कारागृहामधून सुटका होणार अशी माहिती कार्यकर्त्यांना कळल्यानंतर हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात अनेक गंभीर गुन्ह्यातील कैदी, नक्षलवादी आणि दहशतवादी संघटनांचे कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यामुळं मध्यवर्ती कारागृह परिसर हे प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यामुळं कारागृहाबाहेर गर्दी करू नका अशी नोटीस कारागृह प्रशासनाने जारी केली होती. तरी देखील सुनील केदार यांच्या समर्थकांनी रॅली काढली होती.