महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ashish Deshmukh On Nana Patole : बाळासाहेब थोरातांनंतर आशिष देशमुखांची नाना पटोलेंवर आगपाखड; राजीनाम्याची केली मागणी - Ashish Deshmukh demands resignation of Nana Patole

बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप केल्यानंतर कॉंग्रेस नेते आशिष देशमुख यांनी नाना पटोलेंवर टीका केली आहे. नाना पटोलेंवर गंभीर आरोप झाले आहेत, याआरोपांची चौकशी होईपर्यंत त्यांनी पदापासून दूर राहावे, अन्यथा पक्षश्रेष्टींनी त्यांची उचलबांगडी करावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे.

Ashish Deshmukh On Nana Patole
आशिष देशमुख

By

Published : Feb 6, 2023, 10:17 PM IST

कॉंग्रेस नेते आशिष देशमुख संवाद साधताना

नागपूर : नाशिक पदवीधर निवडणूकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेत्यांमध्ये सुरू असलेली धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधात मोर्चा उघडला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात असा संघर्ष पेटला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी नाना पटोलेंवर आरोप करायला सुरूवात केली आहे. आमच्या सारख्या नेत्यांना तर सोडाच पण पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनाही नाना पटोलेंचा त्रास सहन लागत असल्याचा आरोप आशिष देशमुखांनी केला आहे. नाना पटोलेंवर गंभीर आरोप झाले आहेत, याची चौकशी होईपर्यंत त्यांनी पदापासून दूर राहावे, अन्यथा पक्षश्रेष्टींनी त्यांची उचलबांगडी करावी अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे.

नाना पटोलेंवर केले गंभीर आरोप : विधानपरिषदेची निवडणूक आटोपून अवघा आठवडा सुद्धा लोटलेला नाही. मात्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पक्षातूनच हल्ले सुरू झालेले आहेत. सत्यजित तांबे प्रकरणात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जबाबदार असल्याचा आरोप सुरू झाले असून त्यांची पदावरून गच्छंती करावी अशी मागणी जोर धरत आहे. तरूण, तडफदार नेत्यांना त्रास द्यायचा आणि कॉंग्रेसमधून बाहेर फेकायचे, हेच काम प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करीत तर नाही ना असा प्रश्न आशिष देशमुख यांनी केला आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्रास देण्याचेच काम केलेले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

प्रदेशाध्यक्ष विरोधात एकत्र येण्याचे आवाहन : नाना पटोलेंविरुद्ध माझे पत्र मीडियामध्ये लीग झाले होते. तेव्हा पासून अनेक विशेष करून विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मला संपर्क करत आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली आहे आणि आम्ही राजीनामा देण्याचे सत्र सुरू करत आहे, अशा आशयाचा त्यांनी मला त्यांचा विचार सांगितला. आम्ही येणाऱ्या 10 तारखेला मुंबई येथे बैठक घेत आहेत आणि त्या बैठकीच्या माध्यमातून राज्यातील सर्व क्षेत्रातले काँग्रेसचे नेत्यांना, कार्यकर्त्यांना आमंत्रित करत आहोत. काँग्रेसचा अध्यक्ष बदलावा, ही आमची मागणी असल्याचे आशिष देशमुख म्हणाले आहेत.

आशिष देशमुखांनी यांनी पत्रात काय म्हटलंय : आपल्या नेतृत्वात कॉंग्रेस प्रगतीच्या अपेक्षेत आहे. एकेकाळी कॉंग्रेस देशाचा एक प्रमुख पक्ष होता. खरे म्हणजे, कॉंग्रेस हा नुसता राजकीय पक्ष नसून एक विचार आहे, एक चळवळ आहे. कॉंग्रेससारखी परंपरा इतर कोणत्याही पक्षात दिसत नाही. एक मोठा राजकीय पक्ष आज आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतोय, अशी परिस्थिती मागील काही वर्षांपासून उत्पन्न झाली आहे. आपला कॉंग्रेस पक्ष इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा मागे पडला आहे. आपला पक्ष महाराष्ट्रात सकारात्मक कार्य करतांना दिसत नाही, ही वस्तूस्थिती असल्याचे त्यांनी पत्रात म्हटलंय.

नानांनी विश्वास फोल ठरवला : शेतकरी, कामगार, आदिवासी, युवा वर्ग, महिला, शोषित, पिडीत, वंचित, मागासवर्गीय यांचे प्रश्न व्यवस्थित हाताळण्यासाठी तसेच संघटनात्मक कार्य करून ओबीसी, महिलांवरील अत्याचार आणि जनहितार्थ मुद्यांवर मार्ग काढण्यासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये नाना पटोले यांना मोठ्या विश्वासाने कॉंग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली. पण तो विश्वास त्यांनी सपशेल फोल ठरवला. विदर्भ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यशिलीमुळे हा बालेकिल्ला आता कॉंग्रेसच्या हातातून निसटला आहे, हे सर्वश्रुत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

नाना पटोले हेच जबाबदार : सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने कॉंग्रेसची नामुष्की झाली. यात प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेसची दाणादाण उडत आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कॉंग्रेस पुढच्या काळात महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल यासाठी आम्ही कामकाज करू, असे त्यांनी ठासून सांगितले होते. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेसची वाताहत सुरु झाली आहे,असा देखील आरोप त्यांनी केला आहे.

नानांची कृती भाजपसाठी मदत : डिसेंबर २०२१ मध्ये विधान परिषदेसाठी नागपूरच्या जागेवरून कॉंग्रेस उमेदवार रवींद्र भोयर होते. पण मतदानाच्या काही तास आधी नाट्यमय घडामोडी झाल्या, अचानक अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपच्या बावनकुळे यांचा जबरदस्त विजय झाला. जून २०२२ मध्ये विधान परिषद निवडणूकीत चंद्रकांत हांडोरे हे नंबर एक चे उमेदवार होते. पण भाई जगताप यांना जास्त मते मिळाली, त्यामुळे चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. हांडोरे यांना निवडून आणण्याचे हायकमांडचे आदेश होते. तरीही या आदेशाच्या विरोधात निकाल लागला. ४ जुलै २०२२ ला शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी परीक्षा होती. यावेळी विरोधकांची एकजूट महत्वाची होती. पण कॉंग्रेसचे तब्बल १० आमदार या बहुमत चाचणीत गैरहजर राहिले. यामुळे सरकारचे बहुमत मोठ्या प्रमाणात वाढले. पक्षादेश असतांनासुद्धा अनेकांनी पक्ष विरोधी काम केलं. या तीनही प्रकरणांची चौकशी करण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते, त्यासाठी हायकमांडकडे अहवाल पाठवणार असल्याचे दावे त्यांनी केले. पण आजपर्यंत कोणावरही कारवाई झाली नाही किंवा कोणालाही जबाबदार ठरविण्यात आले नाही.

सर्व बाजूंनी कॉंग्रेस तोंडघाशी : सर्व बाजूंनी कॉंग्रेस सपशेल तोंडघाशी पडली आहे. सत्ता गेल्यानंतरसुद्धा महाविकास आघाडी एकसंघ आहे, हे चित्र खोटे ठरले आहे. जर भाजपने पाठींबा दिलेले सत्यजित तांबेसारखे अपक्ष उमेदवार पाचही जागेवर निवडून आले तर विधान परिषदेच्या सभापती पदाचा तिढा तयार होईल. महाराष्ट्रात बेबंदशाही आहे, असे म्हणायलाही आता काही अर्थ उरलेला नाही, असे आशिष देशमुख यांनी पत्रात सांगितले.



राज्यात काँग्रेस चौथ्या स्थानी : राज्यात पक्ष पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. शिंदे गटामुळे पक्ष पाचव्या क्रमांकावरही जाईल. पक्षात शिस्त नाही. मुळात पक्षाच्या विचारधारेवरही नेत्यांच्या मनात आदर नाही. एकीकडे राहुल गांधी भारत जोडायला निघाले आहेत, पण स्थानिक कॉंग्रेस नेत्यांना मात्र पक्षापेक्षा स्वत:च्या सत्तेची पडलेली आहे. अशा कॉंग्रेस विरोधी घटना घडत असतांना प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांमध्ये कारवाई करण्याची धमक उरलेली नाही. तसे केल्यास पक्षात कोण उरेल, अशी भीती त्यांच्या मनात आहे, असे देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.



पक्षांतर्गत गटबाजी हा मोठा प्रश्न : ज्या कॉंग्रेसची पाळेमुळे शहरांपासून तर ग्रामीण भागांपर्यंत रोवली गेली होती त्या पक्षाकडे कार्यकर्तेच उरले नाहीत. म्हणजेच पक्षाचा कणा उरलेला नाही. पक्षांतर्गत गटबाजी हा मोठा प्रश्न राज्यातील कॉंग्रेससमोर उभा ठाकला आहे. संघटनेची घडी विस्कळीत झालेली आहे. आज संघटनेमध्ये चैतन्य निर्माण करण्याची गरज आहे. चैतन्य निर्मितीसाठी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळाला. तरुण वर्गाची गर्दी बघता एका नव्या वर्गाला कॉंग्रेस जवळची वाटत आहे. कॉंग्रेसपासून दुरावलेली माणसे जोडण्याचे काम राहुल गांधी करीत आहेत. परंतु, हा प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तीत करण्यासाठी ठोस रणनीती प्रदेशाध्यक्षंना कितपत जमेल, ही शंका असल्याचे त्यांनी सांगितले.

नेते उरले आहेत परंतु कार्यकर्ते नाहीत : महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष आजच्या घडीला सक्षम नेतृत्व नसणारा पक्ष म्हणून दिसत आहे. विविध निवडणुकींमध्ये सतत होणारे पराभव असण्याचे कारण म्हणजे पक्षाची असलेली दयनीय अवस्था आहे. या पक्षात नेते उरले आहेत परंतु कार्यकर्ते नाहीत. राज्यात या पक्षाचा चेहरा गेल्या अनेक वर्षांपासून बदलला नाही. गेली अनेक वर्षे त्याच-त्या नेत्यांची नावे समोर येत आहेत. तळागाळातील कार्यकर्ते यामुळेच पुढे जाऊ शकले नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. नवे चेहरे क्वचितच दिसत आहेत. परिणामी राजकीय करिअरसाठी कॉंग्रेस विचारसरणीचे लोकं इतर पक्षांमध्ये जात आहेत. त्यामुळे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस असे अनेक पक्ष राज्यात प्रभावशाली होत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा आणि इतर माध्यमांतून तसेच कॉंग्रेसाध्यक्ष म्हणून आपल्या मदतीने कॉंग्रेस पक्षाची पुनर्बांधणी होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. परंतु, महाराष्ट्राचे काय, हा प्रश्न तसाच कायम राहतो.


निर्णायक भूमिका घ्यावी लागणार : महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे भविष्य हे महाराष्ट्रातील लोकांच्या हातात आहे. कॉंग्रेसला निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मजबूत नेते आणि कार्यकर्त्यांचं नेटवर्क तयार करावे लागणार आहे. नेते व कार्यकर्ते पुन्हा नक्कीच जुळतील पण त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील शिर्षत्व नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमधील दुवा म्हणजेच महाराष्ट्र प्रदेशातील नेतृत्व हे सक्षम असणे गरजेचे आहे. म्हणूनच, महाराष्ट्रात कॉंग्रेसची स्थिति सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचा अध्यक्ष तात्काल बदलण्याची नितांत गरज आहे. प्रदेशाध्यक्ष असा असावा, जो महाराष्ट्राच्या गावां-गावांत फिरून जनतेचे प्रश्न उचलून त्यांस वाचा फोडेल आणि कॉंग्रेसची स्थिति मजबूत करेल. कॉंग्रेसच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या पत्राची गंभीर दाखल घ्यावी, अशी विनंती त्यांनी कॉंग्रेसमधील नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना केली आहे.
हेही वाचा : Kasba Bypoll : ...तरच भाजप आपला उमेदवार मागे घेईल; चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान

ABOUT THE AUTHOR

...view details