नागपूर: नागपुरातील सभेत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राज्यातील राजकारणावर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीवर शरसंधान करताना ओवैसी म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणजे तिहेरी लग्न. यात नवरी कोण,नवरदेव कोण हे कळत नाही. तसेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीवरही त्यांनी टीका केली. याचबरोबर ओवैसी यांनी राजकीय पक्षांवर टीका केली. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस,राष्ट्रवादीसह सर्व पक्ष मुसलमानांचा उपयोग फक्त मतांसाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते नागपुरातील सभेत बोलत होते.
ताजुद्दिन बाबाच्या नागपूरला आलो : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची नागपुरात जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर त्यांनी भाजपसह आरएसएसवर जोरदार टीका केली. सभेत बोलताना औवेसी म्हणाले की, मी जेव्हा इकडे यायला निघालो तेव्हा मला कोणीतरी विचारले की तुम्ही कुठे चालले, तर मी सांगितले की नागपूरला चाललो आहे. तर ते म्हणाले आरएसएसच्या नागपूरला चालले आहात का? तर मी म्हणालो नाही, मी ताजुद्दिन बाबाच्या नागपूरला चाललो आहे. मी त्या नागपूरला जात आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे.
पट्टेवाटपात मुस्लिमांवर अन्याय: यावेळी त्यांनी आपल्या भाषण शैलीवरुनही विधान केले. लोक म्हणतात की मी जेव्हा भाषण देतो तेव्हा ते भडकाऊ भाषण असतं. मला याची काहीचं फिकर नाही मात्र,मी जे काही बोलतो ते स्पष्ट आणि खरं बोलतो. सरकारने येथे अनेक झोपडपट्ट्यांना पट्टेवाटप केली आहे, मात्र जिथे मुस्लिम बहुल वस्ती आहे तिथे लोकांना पट्टेवाटप केले नाही. नागपुरात दोन विकास प्राधिकरणे आहेत एक नागपूर महानगरपालिका आणि दुसरे म्हणजे नागपूर सुधार प्रण्यास. दलित आणि मुस्लिम वस्त्या आहेत तिथे विकास होत नाही. पिण्याचे पाणी स्वच्छ येत नाही. जेव्हा तुम्ही विकासाच्या नावावर कर घेतात तेव्हा तुमची ती जबाबदारी आहे, की तुम्ही सर्वांना एक समान न्याय द्यावा. आम्ही पूर्ण सिस्टमला आव्हान देत आमचा आवाज बुलंद करत आहोत. महाराष्ट्रात जातीय दंगली उफाळून आणल्या जात आहेत. मालेगाव, अमरावती, नगर, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी या दंगली घडवण्यात आणल्या. अकोल्यात मज्जिदवर हल्ला करण्यात आला पुस्तके जाळण्यात आली. अकोल्यामध्ये दंगा झाला मात्र तिथले पोलीस अधीक्षक मुस्लिमच्या कार्यकर्त्यांना भेटायलाही तयार नाहीत.