नागपूर - मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंगबाजी करताना वाहतुकदारांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी नागपूर शहरातील सर्व प्रकारचे लहान-मोठे उड्डाणपूल बंद ठेवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षातील इतिहास लक्षात घेता दरवर्षी शहरातील उड्डाणपूल बंद ठेवले जातात. यावर्षी या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना पोलीस दिसून येत आहेत. प्रत्येक पुलाच्या दोन्ही टोकाला पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद
उपराजधानी नागपुरात अनेक मोठे उड्डाणपुल आहेत. ज्यामध्ये चार किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाचा समावेश आहे. यावरून दरदिवशी हजारो वाहन ये-जा करतात. आज मकरसंक्रांतीच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी असते. त्यामुळे पुलावरून जाणाऱ्या दुचाकी वाहन चालकांच्या गळयात मांजा अडकून एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक भागातील उड्डाणपूल संपूर्ण दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे.