नागपूर :राज्यातील राजकारण हे दिवसेंदिवस चिघळत आहे. येणाऱ्या सार्वत्रिक जनगणनेत ओबीसींची गणना केली पाहिजे. कुठल्या घटकावर अन्याय होणार नाही, अशी भूमिका घेतली पाहिजे. अठरापगड जातींना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, असे अजित पवार म्हणाले आहेत. विदर्भात राष्ट्रवादीची ताकद वाढली पाहिजे. यशवंतराव चव्हाण यांनी गरजेचे राजकारण केले, तसेच आम्हालाही गरजेचे राजकारण करायचे आहे. नवे चेहरे कसे देता येतील? अशा प्रकारचा प्रयत्न आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी सुद्धा लोकांच्या संपर्कात राहिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
गृह विभाग काय करत आहे :जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न होतो आहे, ते कोणी करते याचा शोध घेतला पाहिजे. नागपूरातून अनेक मुली व महिला बेपत्ता झाल्या आहेत. गृह विभाग काय करतो आहे? यामध्ये काय तथ्य आहे? ते शोधले पाहिजे. वस्तुस्थिती शोधली पाहिजे. लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज देशात आणि राज्यात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. मोठी गुंतवणूक आणि रोजगार देणारे उद्योग बाहेर निघून गेले. या विदर्भात तर प्रत्येक वेळी हेच बघायला आणि ऐकायला मिळते की, मिहानचे काम पूर्ण व्हायचे आहे, गडकरी साहेबांचे वजन आहे. केंद्रात आणि राज्यात ही सरकार तुमचे आहे. देवेंद्र फडणवीस हे आता उपमुख्यमंत्री आहेत. गेले पाच वर्षे मुख्यमंत्री होते. करा ना मग मिहान गतिमान, आमचा सपोर्ट आहे. विरोध करणारे आम्ही नाहीत, असे ते म्हणाले आहेत.
राज्यातील इतर प्रश्नांकडे लक्ष द्या :राज्यात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. मुख्यमंत्री तर 40 आमदारांना सांभाळण्यात व्यस्त आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण तुम्ही ऐकले, ज्यात त्यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे केले. नाव देताना असे नाव द्या की, पुन्हा कोर्टातून कुठेही स्थगिती येता कामा नये, त्याचबरोबर राज्यातील इतर समस्यांकडेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवे, असे पवार म्हणाले.