नागपूर - मला श्रेय नको तर जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. बहुप्रतिक्षित नागपूर माझी मेट्रोच्या अॅक्वा लाईनचे आज (मंगळवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मुंबई-पुणे महामार्ग हा बाळासाहेबांचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. हा प्रकल्प कसा होणार असा प्रश्न होता. मात्र, त्यावेळी गडकरींनी विश्वास दाखवला आणि प्रकल्प पुर्ण केला. वेळेच्या आत प्रकल्प गडकरींनी पूर्ण केला. तसेच एका गाडीत नाही मात्र, एका स्टेशनवर आपण एकत्र आलो आहोत. असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले. आपण मुख्यमंत्री असताना पुढाकार घेतला विकास कामाना प्राधान्य दिले आहे. मला श्रेय लाटायचे नाही तर मला सर्वांना श्रेय द्यायचे आहे. असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
मला श्रेय नको तर जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहे, असेही ते म्हणाले. विकास कामात कधीही विरोध करणार नाही. ते थांबवणार तर विकासाचा वेग कायम ठेवणार. तसेच उपराजधानी कधी मागे पडू देणार नाही. मुंबई, नागपूरसह इतर शहरांचा विकास साधणार, असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रत्येक शहराची ओळख असते. एक चेहरा असतो तो कायम ठेवला पाहिजे. यासोबत पर्यावरणाचाही विचार झालाच पाहीजे, असे ते म्हणाले. तर आता नागपूर मेट्रोची जबाबदारी आता नागपूरकरांची आहे. परदेशी पाहुणे ही मेट्रो पहायला यायला पाहीजे, असे ते म्हणाले.
केंद्राकडे काही प्रकल्प अडकलेले आहेत. त्या प्रकल्पांना तातडीने परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केंद्र सरकारला केली. दोन्ही सरकारांनी हातात हात घालून काम केले तर अडचण येणार नाही, असेही ते म्हणाले. एकत्रित काम करून अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवू, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. नागपूरला येऊन एकदा तरी मेट्रोमधून नक्की प्रवास करणार, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.