नागपूर :महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्य रेषा बदलावणारा मार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग असाच काहीसा प्रचार-प्रसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटना वेळी करण्यात आला. २२ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्ग हा लोकांसाठी खुला झाला त्यानंतर आजवर या मार्गावर शेकडो अपघात घडले आहेत. ज्यामुळे अनेकांच्या हसत्या खेळत्या संपूर्ण कुटुंबाचीचं राखरांगोळी झाली आहे. अगदी उद्घाटनाच्या दिवशीपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली.
अपघात होण्यामागे नेमके कारणे काय :अजूनही दररोज अपघात घडत आहेत. इतक्या उत्तम रस्त्याची निर्मिती केल्यानंतर देखील अपघात होण्यामागे नेमके कारणे काय आहे. हे जाणून घेण्यासाठी (VNIT) विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या चार विद्यार्थ्यांनी अनेक दिवस अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. ज्यामध्ये हायवे- संमोहन नावाचा प्रकार पुढे आला आहे. प्रफुल मडधे, प्रतीक गजलेवार, विनय राजपूत, आयुष्य दूधबावरे अशी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची नाव आहेत. हायवे संमोहन हा विषय नवीन आहे. रोजच्या रोज घडणाऱ्या अपघातांसोबत हायवे संमोहनचे काय नाते आहे याबद्दल तथ्य जाऊन घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने या विद्यार्थ्यांची भेट घेतली तेव्हा काही महत्वाचे मुद्दे पुढे आले आहेत.
अपघातांमुळे चिंता वाढली :डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहिल्या टप्याचे लोकार्पण झाले होते. नागपूर ते शिर्डी पर्यंतचे अंतर अवघे पाच ते सहा तासांवर आले. परंतु रोजच्या रोज होत असलेल्या अपघातांमुळे चिंता वाढली आहे. त्यामुळेचं नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी तीन महिने अभ्यास केला.