नागपूर Aaditya Thackeray on Democracy :आपल्या देशात खरचं लोकशाही उरली आहे का, असा प्रश्न विचारत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर घणाघाती शब्दांत टीका केलीय. ते मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुरणा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी नागपुरला आल्यावर बोलत होते. गेली दीड वर्ष घटनाबाह्य सरकार राज्यात अस्तित्वात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवरील पांढुरणा येथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे चिरंजीव नकुलनाथ यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदित्य ठाकरेंंना निमंत्रित करण्यात आलंय.
मध्यप्रदेशात निवडणूक लढवण्याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील : कमलनाथ यांच्यासोबत आमचं फार जुनं नात आहे. आमच्या नात्यात वेगळंपण आहे. सत्तेत असताना आणि नसताना देखील ते आम्हाला मार्गदर्शन करत असल्याचं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशात निवडणूक होणार आहे. कोणते पक्ष निवडणूक लढवतील या संदर्भात भारत आघाडी निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. याशिवाय मध्यप्रदेशच्या निवडणुकीत आम्ही सहभाग घेणार किंवा नाही याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेणार असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.