नागपूर/वर्धा :वर्धा येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देशभरातील अनेक साहित्यिक आणि कवी एकत्रित आले आहेत. मात्र, काही साहित्यिक आणि कवी आहेत जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे अकोला जिल्हाच्या तेल्हारा येथील कवी शिवराजे जामोदे (कविराज), यांनी चक्क बंगाली कुर्त्यावर स्वतः रचलेली कविताच छापली. तो कुर्ता देखील परिधान केला आहे. साहित्य संमेलनाच्या परिसरात फिरताना अनेक जण त्यांना थांबवून त्यांच्या कुर्त्यावरील कविता वाचतात. एवढेच नाही तर त्यांचे वेगळे रूप बघून त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणांची रीघ लागलेली असते.
प्रत्येक साहित्य संमेलनात अशाच प्रकारची वेशभूषा : माय मराठी भाषेचे संवर्धन व्हावे आणि मराठी भाषा जगाची भाषा व्हावी यासाठी कवी शिवराजे जामोदे प्रत्येक साहित्य संमेलनात अशाच प्रकारची वेशभूषा परिधान करतात. त्यांनी चक्क आपल्या कपड्यांवर कविता छापून आणलेली आहे. त्यांनी आजवर 3000 मराठी सुविचारांचे लेखन केले आहे. याशिवाय कोरोना काळात सलग 1001 कविता लिहिण्याचा विक्रम केला आहे.
मुलाखत व मुक्त संवाद :शुक्रवार, 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांची प्रकट मुलाखत मुक्ता पुणतांबेकर, विनोद सिरसाट व विवेक सावंत घेतली. याच दिवशी सायंकाळी 5.30 वाजता प्रसिद्ध मराठी सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे व कवी 'सौमित्र' किशोर कदम यांचा सहभाग असलेला 'मुक्त संवाद' हा कार्यक्रम होणार आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहूल कर्डिले हे अध्यक्षस्थानी राहणार असून संवादक बालाजी सुतार राहतील. कवितेचा जागर व इतर कार्यक्रमदेखील आहेत.दुसरे कविसंमेलन 4 तारखेला रात्री 8.30 वाजता श्याम माधव धोंड यांच्या अध्यक्षतेत होईल. शिवाय, गझलकट्टा, कविकट्ट्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रभरातून आलेले सुमारे 900 कवी तीन दिवस कवितेचा जागर करणार आहेत.
290 ग्रंथदालने :ग्रंथप्रदर्शन व वाचन मंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथनगरीत भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून यात एकुण 290 ग्रंथदालने राहणार आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, गोवा येथील राजहंस, मॅजेस्टिक, मौज, पॉप्युलर, मेहता, रोहन, दिलीपराज, साधना इत्यादी प्रकाशनांची पुस्तके येथे विक्रीसाठी उपलब्ध राहतील. याशिवाय, वाचन मंच, बालसाहित्य मंच, बसोली ग्रुप व स्कुल ऑफ स्कॉलर्सतर्फे चित्रकाव्य प्रदर्शन इत्यादी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी मराठी रसिक, वाचकांना मिळणार आहे.
हेही वाचा :Marathi Sahitya Sammelan : सामाजिक तळमळीतून साहित्यिक जन्माला येतो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे