नागपूर- महानगरपालिकेच्या हिवताप विभागाने नुकत्याच केलेल्या तपासणीत शहरात डेंग्यूच्या तब्बल २ हजार अळ्या आढळल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना न केल्यास डेंग्यूचा प्रकोप होण्याची भीती वर्तविली जात आहे. मनपातर्फे दूषित घर आणि परिसरांमध्ये कीटकनाशक फवारणी करण्यात आली. परंतु, ज्या घरांमध्ये डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आले त्या घरांची तपासणी केली असता शेकडोवर वस्त्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या.
नागपूरमध्ये आढळल्या तब्बल २ हजार डेंग्यूच्या अळ्या - महानगरपालिका
नागपूरमध्ये महानगरपालिकेच्या हिवताप विभागाने नुकत्याच केलेल्या तपासणीत शहरात डेंग्यूच्या तब्बल २ हजार अळ्या आढळल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना न केल्यास डेंग्यूचा प्रकोप होण्याची भीती वर्तविली जात आहे.
जनजागृती करूनही नागरिक घर आणि परिसरात स्वच्छता ठेवत नसल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. याला आळा घालण्यासाठी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यास संबंधित घरमालक आणि व्यापाऱ्याला ५ हजारांचा दंड आकरण्यात येईल, अशी ताकीद मनपातर्फे फेब्रुवरी २०१९ मध्ये देण्यात आली. मात्र, शासनाकडून प्रस्ताव मंजूर न झाल्याने कुणावरही कारवाई करण्यात आली नाही.
तसेच मागच्या वर्षीदेखील डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यास २०० रुपये दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अंबाजावणी झालीच नाही. दरम्यान, आधीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असताना दुसऱ्या प्रस्तावाला मंजूरी कधी मिळणार, असा प्रश्न आहे. डेंग्यूच्या अळ्यांची वाढ झालेल्या परिसरातील नागरिकांवर मनपातर्फे कुठलीही कारवाई होत नसल्याने अस्वच्छतेची समस्या कायम आहे.