महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालिका शाळांमधील विद्यार्थी वह्यांपासून वंचित, युवासेनेच्या सद्स्याचा सेनेला घरचा आहेर - मुंबई महापालिका शाळा

शिक्षण समितीच्या बैठकीत युवा सेनेचे राहुल कनाल यांनी मंगळवारी पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या मिळाल्या नसल्याचे निदर्शनास आणले. शालेय शिक्षणाचे अर्धे वर्ष संपले तरी वह्या मिळाल्या नाहीत. त्या कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला.

राहुल कनाल

By

Published : Nov 20, 2019, 8:09 AM IST

मुंबई -महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी म्हणून विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. गेली २ वर्ष शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देण्यात आल्या. यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने यावर्षीही पहिल्याच दिवशी शालेय वस्तू देण्याची घोषणा केली. मात्र, विद्यार्थ्यांचे अर्धे शालेय सत्र संपत आले तरी त्यांना वह्या मिळालेल्या नाही, असे निदर्शनास आणत युवा सेनेचे राहुल कनाल यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला.

युवासेनेच्या सद्स्याचा सेनेला घरचा आहेर

यंदा लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू असल्याने टेंडर प्रक्रियेला उशिर झाला. त्यात शालेय साहित्य शाळांमध्ये वेळेवर पोहोचले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना उशिरा साहित्य वाटप करण्यात आले.

शिक्षण समितीच्या बैठकीत युवा सेनेचे राहुल कनाल यांनी मंगळवारी पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या मिळाल्या नसल्याचे निदर्शनास आणले. शालेय शिक्षणाचे अर्धे वर्ष संपले तरी वह्या मिळाल्या नाहीत. त्या कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला. नगरसेवक आपल्या विभागात आपले फोटो लावून वह्या वाटप करतात. त्याच प्रकारे सर्व नगरसेवकांनी आपल्या विभागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप कराव्यात, अशी मागणी कनाल यांनी केली.

यावर उत्तर देताना वह्या पुरवठा करणारा कंत्राटदार पालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात गेला. त्याला न्यायालयाने पालिकेच्या संबंधित समितीकडे जाण्यास सांगितले. आयुक्तांनी याप्रकरणी उपायुक्त सुनिल धामणे यांना सुनावणी घेण्यास सांगितले. धामणे यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात कंत्राटदाराने अतिरिक्त आयुक्तांकडे दाद मागितली आहे. याबाबत संबंधित अतिरिक्त आयुक्तांना लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती केली जाईल असे सलील यांनी सांगितले. दरम्यान, सीएसआर फंडामधून विद्यार्थ्यांना वह्या विकत घेऊन देण्यात याव्यात, असे निर्देश शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details