मुंबई- वडाळा शाखेच्या रेल्वे पोलिसांनी महाराष्ट्र सुरक्षा फोर्स (एमएसएफ) च्या महिला कर्मचाऱ्याला अश्लील व्हिडिओ पाठवणाऱया युवकास अटक केली आहे. सुरेंद्र सकटे असे आरोपी युवकाचे नाव असून हा आरोपी गेल्या काही दिवसांपासून या महिला कर्मचाऱयाला अनोळखी व्हॉट्सअॅप क्रमांकावरून अश्लील व्हिडिओ पाठवत होता. या गोष्टीला कंटाळून पीडित महिलेने वडाळा जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून पोलीस तपास सुरू आहे.
एमएसएफ महिला कर्मचाऱ्याला अश्लील व्हिडिओ पाठविणाऱ्या युवकास अटक - arrested
सुरेंद्र सकटे असे आरोपी युवकाचे नाव असून हा आरोपी गेल्या काही दिवसांपासून या महिला कर्मचाऱयाला अनोळखी व्हॉट्सअॅप क्रमांकावरून अश्लील व्हिडिओ पाठवत होता.
पोलिसांनी ज्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरुन मेसेज आले होते त्या मोबाईलला ट्रेस केले असता हा मोबाईल सातारा शहरातील एका आनिसा बागवान या महिलेचा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या महिलेची चौकशी केली असता, हा मोबाईल आपला असून तो हरवला असल्याचे तिने सांगितले. पीडित महिलेच्या मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या मेसेजला उत्तर देण्यासाठी स्वतः पोलिसांनी आरोपीसोबत चॅट करण्यास सुरुवात केली होती. या पोलिसांच्या चॅटला उत्तर देत असलेल्या आरोपीच्या लोकेशनबद्दल पोलिसांना माहिती मिळाली असता हा आरोपी जत तालुक्यातील डोरली गावात असल्याचे आढळून आल्यावर पोलिसांनी त्यास त्याच्या घरातून अटक केली आहे.
सदर आरोपीचे आई-वडील शिक्षक असून त्याने आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. आरोपी युवक गेल्या काही महिन्यांपासून अशाच प्रकारे फक्त व्हॉट्सअॅप नंबर वापरून अश्लील व्हिडिओ पाठवत होता. हे व्हिडिओ तो त्याच्या परिचयातील , गावातील स्त्रियांना पाठवत असे. मात्र कुणाशीही संपर्क साधण्यासाठी केवळ तो व्हॉट्सअॅप कॉलिंग करीत असल्याने त्याचे लोकेशन शोधणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते.