मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्राचे आदर्श आहेत. पण, त्यांच्या इतिहासाच्या प्रचारासाठी स्वतःला पूर्ण वेळ वाहून घेणारा तरुण महाराष्ट्रात आहे. निलेश सकट असे त्याचे नाव असून, महाराजांच्या इतिहासाच्या प्रचारासाठी त्याने त्याची नोकरी सोडली आहे. शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन देशभर भरवण्याचा निश्चय त्याने घेतला आहे.
निलेश सकट हा कोपरखैरणे येथील रहिवासी आहे. लहानपणापासून त्याला शस्त्र संग्रहाची आवड आहे. यातूनच दुर्मिळ शस्त्र संग्रहाच्या सहाय्याने महाराजांचा इतिहास जगासमोर मांडू शकतो, अशी कल्पना त्याला सुचली. गेल्या १२ वर्षांपासून निलेश शिवकालीन इतिहास शस्त्रांच्या माध्यमातून सांगत आहे.
शस्त्र संग्रहासाठी सोडली नोकरी
शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि त्याकाळातील नाणी शोधण्यासाठी तो राजस्थान, केरळ, मध्यप्रदेशसह पूर्ण भारतभर फिरला आहे. सुरुवातीला नोकरी सांभाळून तो प्रदर्शन भरवायचा. परंतु, त्याला यासाठी वेळ मिळत नव्हता. दुर्मिळ शस्त्र जमा करण्यासाठी त्याला कुठेही जाता येते नव्हते. म्हणून त्याने ठरवले, की नोकरी सोडून द्यायची आणि पूर्णवेळ शिवकालीन वस्तूच्या प्रदर्शनासाठी द्यायचा. आता निलेशकडे तलवारी, भाले, फरशी, विटा, जगदापुरी, मुघल तलवार, वाघ नखे, कट्यार अशा विविध प्रकारातील १ हजारपेक्षा जास्त शस्त्रे आहेत.
निलेशने आतापर्यंत गुजरात, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र येथे शस्त्र संग्रहाचे प्रदर्शने भरवले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ३५० प्रदर्शन त्याने भरवली आहेत. या शस्त्रांना मोठा इतिहास आहे. लोकांना याची माहिती मिळावी हा हेतू यामागे आहे. ही शस्त्रे आपल्या पूर्वजांनी जिंकलेल्या युद्धाचे साक्षीदार आहेत. हा इतिहास मला जगासमोर आणायचा होता, असे निलेश सांगतो.
महाराजांच्या सैन्यातील सैनिकांनी पराक्रम गाजवलेली शस्त्रे, मुगलांची शस्त्रे माझ्या संग्रहात आहेत. सर्वसामान्य पोटासाठी नोकरी करतात मी ही केली. पण मला शस्त्रांचा अभ्यास आणि भारतभर फिरण्यासाठी वेळ मिळत नव्हता, म्हणून नोकरी सोडली. आता पूर्णवेळ हा अभ्यास करतो. शस्त्र शोधताना अनेक अडचणी आल्या. काही विशेष किंमती देऊनही शस्त्रे विकत घ्यावी लागली, अशी माहिती निलेशने दिली.