मुंबई- वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विजय सिंग (२६) असे त्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांनी पोलिसांना धरले जबाबदार - Wadala Truck Terminal
मुंबईतील वडाळा ट्रक टर्मिनल येथे काही व्यक्ती भांडत होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तींना ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर अदखपात्रचा गुन्हा दाखल केला. या तरुणांमध्ये विजयसिंगचा सामावेश होता.
२७ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वडाळा ट्रक टर्मिनल येथे काही व्यक्ती भांडत असल्याचा पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला होता. त्यानुसार पोलिसांची बीट मार्शल पथकाने घटनास्थळी धाव घेत काही व्यक्तींना ताब्यात घेतले होते.ज्यात विजय सिंगचाही सामावेश होता. पोलीस ठाण्यात आल्यानंतर या तरुणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर काही वेळातच विजयसिंगच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्यामुळे त्याला तात्काळ सायन रुग्ण्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
विजयसिंगचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. सध्या विजयसिंगचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस विभागाचे प्रवक्ते अशोक प्रणय यांनी दिली आहे.