मुंबई- भारतीय निवडणूक आयोगाकडून यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये, मुंबई जिल्ह्यातील २६० मतदान केंद्रावर 'वेबकास्टिंग'ची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी एका खासगी कंपनीशी करार करण्यात आला आहे. या वेबकास्टिंग प्रयोगामुळे मतदान केंद्रात चालणारे कामकाज लोकांना पाहता येणार आहे. याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
माहिती देताना मुंबई शहर उपजिल्हाधिकारी फिरोघ मुक्कादम
वेबकास्टिंग कुठे पाहता येणार -
कॉम्प्युटरवर लावलेल्या कॅमेर्याच्या माध्यमातून कॉम्प्युटरसमोर घडलेल्या घटनेचे चित्रण इंटरनेटच्या माध्यमातून त्याचवेळी दुसर्या कॉम्प्युटरवर तसेच पालक कॉम्प्युटरवर किंवा मोठ्या पडद्यावर उपलब्ध करून देणे म्हणजे वेबकास्टिंग. ते आयोगाला नियंत्रण कक्षात बघून पाहता येते. तसेच हेच चित्रण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन कुणालाही पाहता येणार आहे.
मुंबईत २९ एप्रिलला लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघातील २६० संवेदनशील मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा भारतीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याची माहिती मुंबई शहर उपजिल्हाधिकारी फिरोघ मुक्कादम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्याच्या हेतूने, प्रथम ईव्हीएम मशिनवरील संशय दूर करण्यासाठी व्हीव्हीपॅट प्रणाली सुरू केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवरील हालचालींवर वेबकास्टिंगच्या माध्यमातून लक्ष दिले जाणार आहे.
२०१४ च्या निवडणुकांमध्ये वेबकास्टिंग तंत्रज्ञानाचा प्रयोग प्रथम करण्यात आला होता. त्यामुळे मतदानाचे प्रमाण वाढल्याचे निष्कर्ष निवडणूक आयोगास प्राप्त झाला. त्यामुले यावेळी वेबकास्टिंगची संख्या वाढवण्यात आल्याची माहिती मुंबई निवडणूक यंत्रणेच्या व मुंबई शहराच्या उपजिल्हाधिकारी मुक्कादम यांनी दिली.
संवेदनशील मतदान केंद्रावरील मतदान काळातील हालचाली पाहण्यासाठी आतापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना वेबकास्टिंग सुविधा उपलब्ध होती. आता सामान्य मतदारांसाठीसुद्धा ही सेवा निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर देण्यात येणाऱ्या लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर सीसीटीव्हीही नजर ठेवणार आहे. वेबकास्टिंगमुळे ही केंद्रे ऑनलाइन होणार आहेत. वेबकास्टिंगची लिंक आयोगाच्या वेबसाइटवर दिली जाणार असल्यामुळे प्रत्येक जण मतदान केंद्रावरील हालचालींवर नजर ठेवू शकणार आहे.
निवडणुकांच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडल्यास, त्याची माहिती देण्यासाठी १९५० ही टोल फ्री सेवा मतदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. पूर्वी राज्य निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाशी जोडलेली ही सेवा आता थेट संबंधित जिल्हा नियंत्रण कक्षास जोडली आहे. परिणामी, कार्यवाही तत्काळ होऊ शकते, त्यामुळे निवडणूक आयोग आता पोलीस आणि अग्निशमन केंद्रांप्रमाणे जिल्हास्तरावर १९५० ही टोल फ्री दुरध्वनी सेवा सुरू करण्यात आली आहे.
इंटरनेट सेवा बंद झाल्यास, कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग सुरूच राहणार -
मुंबईमधील २६० संवेदनशील मतदान केंद्रांवर चित्रीकरणाकरिता कॅमेरे बसविण्यात येत आहेत. हे सर्व कॅमेरे इंटरनेटच्या माध्यमातून थेट निवडणूक आयोग नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी नियंत्रण कक्ष, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि रायगड व मावळ निवडणूक नियंत्रण कक्षांशी जोडलेले राहतील. काही कारणास्तव इंटरनेट सेवा बंद पडली, तर मतदान केंद्रावरील कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग सुरूच राहील आणि ते रेकॉर्डिंग सर्व ठिकाणी उपलब्ध करून देण्याचीदेखील व्यवस्था वेबकास्टिंगटीमद्वारेच करण्यात येणार आहे.