मुंबई- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात दहशतवादी हल्ल्याने घायाळ झालेल्या मुंबईला भयमुक्त करुन महाराष्ट्र आणि देश दहशतवादी हल्ल्यापासून मुक्त ठेवण्याचे श्रेय मोदी सरकारला जाते. त्यामुळे पुन्हा देशात नरेंद्र तसे राज्यात देवेंद्र महत्त्वाचे आहेत. त्यामुळे, भाजप महायुतीला निवडून देण्याचे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज केले.
मुंबादेवीचे दर्शन घेऊन सभास्थळी योगी आदित्यनाथ दाखल झाले. यावेळी व्यासपीठावर आमदार राज पुरोहित, शायना एन.सी. आणि उमेदवार मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, पांडुरंग सपकाळ यांसह आदी उपस्थित होते.
पुढे योगी आदित्यनाथ म्हणाले, सकाळपासून महाराष्ट्रात नांदेड, जळगाव आणि मुंबईत सभा घेतल्या. राष्ट्रवाद आणि विकास लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आहे. देशाच्या विकासाचा अजेंडा बदलला आहे. भारत मोठी आर्थिक ताकद बनणार आहे. आमच्या सरकारने कलम ३७० रद्द करुन डॉ. आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण केले, असे ते म्हणाले.
शामाप्रसाद मुखर्जींचे स्वप्न पूर्ण करायला ७० वर्षे लागले. मुंबई, महाराष्ट्र आणि देश दहशतवादी हल्ल्यांपासून मुक्त ठेवण्याचे श्रेय मोदी सरकारला जाते. तिहेरी तलाक रद्द करुन महिला सन्मानाचे काम केले. भारताचा सन्मान जगात वाढला आहे. पाकिस्तानला भारताने नामोहरण केले, असे ते म्हणाले.