मुंबई Congress Screening Committee: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) काँग्रेसच्या वतीनं क्लस्टर निहाय अध्यक्ष आणि दोन सदस्यांची स्क्रीनिंग समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशभरातील सर्व राज्यांसाठी पाच क्लस्टर समित्या नेमण्यात आल्या आहेत. त्यानुसार हरीश चौधरी, मधुसूदन मिस्त्री, रजनीताई पाटील, भक्त चरणदास आणि राणा केपी सिंग यांच्या अध्यक्षतेखाली या समित्या काम करणार आहेत.
रजनी ताई पाटील यांच्याकडे राजस्थानची जबाबदारी : राज्यसभेतील खासदार रजनीताई पाटील यांच्याकडं राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, दिल्ली आणि दादरा नगर हवेली या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या क्लस्टर समितीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहणार आहेत. तर काँग्रेसच्या आमदार आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांची उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदिगड, जम्मू काश्मीर आणि लडाख या राज्यांच्या स्क्रीनिंग समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी ही यादी प्रसिद्ध केली असून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या सर्व समित्यांची नियुक्ती केली आहे.