मुंबई - कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव राज्यात कमी होत असतानाच आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा या एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात येत असल्याची घोषणा केली. आज मंत्रालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
राज्य शिक्षण मंडळाची दहावीची लेखी परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत घेतली जाणार असून हा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. तर, बारावीची लेखी परीक्षा ही २३ एप्रिल ते २९ मे या कालावधीत घेतली जाणार असून बारावीच्या परीक्षेचा निकाल हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. या परीक्षा घेताना राज्यातील स्थानिक स्तरावरील माहिती घेऊनच त्यासाठीचे नियोजन केले जाणार असून, कोविड आणि त्यासंदर्भातील सर्व खबरदारी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या परीक्षांच्या कालावधीत एखादा विद्यार्थी क्वारंटाईन अथवा कोविडमुळे परीक्षेला मुकला, तर त्याच्या फेरपरीक्षेसंदर्भातही निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली.
हेही वाचा -वर्कफ्रॉम होम ट्रेंडचा बांधकाम क्षेत्राला 'असा'ही फायदा
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासोबत इतर केंद्रीय शिक्षण मंडळांनी आपल्या दहावी-बारावीच्या परीक्षांची वेळापत्रक आणि त्यांचे नियोजन जाहीर केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा आणि त्यांचे वेळापत्रक कधी जाहीर केले जाईल, याकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. दहावीच्या लेखी परीक्षांपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा या ९ ते २८ एप्रिल या दरम्यान, तर बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा या १ ते २२ एप्रिल दरम्यान घेतल्या जाणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.