मुंबई Khashaba Jadhav : भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची जयंती 'राज्य क्रीडा दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. खाशाबा जाधव यांचं क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदान लक्षात घेत राज्य सरकारनं हा निर्णय घेतला. "आता यापुढे १५ जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाईल. यामुळे क्रीडापटूंच्या वर्तमान आणि भावी पिढ्यांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी प्रेरणा मिळेल", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
क्रीडा अनुदानात वाढ : राष्ट्रीय क्रीडा दिन आणि क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार रुपयांचं अनुदान देण्यात येत होतं. आता यात वाढ करून प्रत्येक जिल्ह्याला ७५ हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनासाठी ५० हजार तर क्रीडा सप्ताहासाठी १ लाख रुपये, असे एकूण २ लाख २५ हजार रुपये सुधारित अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णयही घेण्यात आला.