मुंबई- जगभरात कर्करोगाच्या संदर्भात अनेक विकसित देशांमध्ये अनेक प्रकारचे संशोधन केले जाते. आपल्याकडे याविरुद्ध परिस्थिती आहे. अजूनही आपल्या देशात केवळ उपचारच केला जातो. त्यामुळे येत्या काळात देशात कर्करोगावर मात करण्यासाठी नव नवीन संशोधन करण्याची गरज असल्याचे मत कर्करोग तज्ज्ञ डॉ. दिलीप निकम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.
जगभरातील कर्करोगाच्या उपचारात संदर्भात ते म्हणाले की, आज जगभरामध्ये कर्करोगाचे उपचार करण्यासाठी ठराविक अशा गाईडलाईन देण्यात आलेल्या आहेत आणि त्या गाईडलाईन प्रमाणेच उपचार केले जातात. परंतु, यामध्ये सर्वात महत्त्वाची असे की, उपचार करताना त्यासाठीच्या पायाभूत सुविधा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आणि इतर विविध प्रकारच्या सोयीसुविधा यांचा फार मोठा फरक विकसित देशात आणि आपल्याकडे जाणवतो.
आपल्या देशातील रुग्णांची संख्या लक्षात घेतली, तर त्या मानाने आपल्याकडे कर्करोगासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यातच कर्करोगासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा प्रचंड मोठा अभाव आहे. त्यामुळे एकीकडे रुग्णांचे प्रमाण जास्त आणि तज्ज्ञांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जे तज्ज्ञ आहेत त्यांना 1 दिवसात अनेक रुग्णांवर उपचार करावा लागतो. त्यामुळे युरोपीय देशात आणि आपल्याकडे प्रमुख फरक म्हणजे आपल्याकडे केवळ उपचारावर लक्ष दिले जाते आणि विकसित देशात मात्र कर्करोग अधिकाधिक लवकर बरा होण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन केले जाते. त्यासाठीची परिस्थिती निर्माण होण्यासाठी अनेक प्रकारच्या धोरणांची गरज असल्याचे मत डॉ. निकम यांनी व्यक्त केले