मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा टाळेबंदी होईल याची कामगारांना धास्ती आहे. गेल्या वर्षी टाळेबंदीमध्ये झालेले हाल पुन्हा होऊ नये, या भीतीने शहरातील कामगारांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. यामुळे अनेक दुकानात कामगारांची कमतरता जाणवू लागली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी..
हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर असल्याने दुकाने, उपहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारीवरील मजूर टाळेबंदीच्या चिंतेने हवालदील झाले आहेत. तसेच टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस नको या भीतीने कामगारांनी घराची वाट धरली आहे. पुन्हा मागच्या वर्षीसारखे हाल होऊ नये, यासाठी कामगार आपल्या गावी परत जात आहेत. अगोदर माझ्याकडे 10 कामगार होते आता फक्त तीन ते चार कामगार उरले आहेत. बाकी सर्व कामगार हे गावी गेले आहेत. यामुळे अनेक कामे रखडली आहेत, असे दुकानदार बहरुलाल मीना यांनी सांगितले.