मुंबई - देशात महिलांना सोयी-सुविधा देण्याच्या मोठ्या घोषणा केल्या जातात. मात्र, खरे पाहिले तर त्या पूर्ण होताना दिसत नाहीत. 'बेटी बचाव बेटी पढाव' असा नारा देणाऱ्या भाजप सरकारच्या काळात सध्या एक मुलगी तुटलेल्या झोपडीतून देशासाठी खेळण्याचं स्वप्न पाहत आहे. मेरी प्रकाश नायडू असे तिचे नाव असून फुटबॉलमध्ये देशाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगले आहे.
तिच्या खेळाचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत केला होता. मिलेनियम फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्रातून निवड झालेल्या ३ फुटबॉलपटूपैकी मेरी नायडू एक होती. मेरीने मिलेनियम फुटबॉल स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत वन मिलेनियम ऑफ महाराष्ट्राचा बहूमान मिळवला होता. परंतु आज मेरीची परिस्थिती खूप हलाखीची आहे.
मेरीने दहावीनंतर शिक्षण सोडल आहे. घरची परिस्थिती हालाकिची असल्यामुळे ती शिक्षणापासून वंचित आहे. तिचे स्वप्न असलेला खेळ ती आता खेळत नाही. याच कारण म्हणजे मेरीच्या घरची परिस्थिती आहे. मेरी किंग सर्कलच्या पदपथावर असणाऱ्या प्लॅस्टिकच्या कापड लावलेल्या झोपडपट्टीत राहते. वडील कंत्राटी सफाई कामगार आहेत. घरी मेरीसह २ बहिणी आणि आई, असे कुटुंब आहे.
मेरीचे प्राथमिक शिक्षण महापालिका शाळेत व नंतर शाहू महाराज शाळा धारावी येथे झाले. ते करताना तिने फुटबॉल या खेळात नाव कमावले. परंतु घरची परिस्थिती गंभीर असल्यामुळे तिला पुढे शिक्षण व खेळ चालू ठेवणे कठीण जात आहे. म्हणून तिने ते थांबवले आहे. सरकार मोठ्या गाजावाजा करत जागतिक महिला दिवस साजरा करेल पण खेळासाठी परिस्थितीशी दोन होत करणाऱ्या अशा मुलींचे काय? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. मेरीसारखेच तिच्या दोन्ही बहिणींची स्वप्न आहेत. एकीला हॉकीपटू तर दुसरीला बॅडमिंटनपटू व्हायचे आहे.
फुटबॉल क्षेत्रात देशाचे प्रतिनिधित्व करू पाहणाऱ्या मेरीला सध्या मदतीची आवश्यकता आहे. आर्थिक अडचण आणि रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या मेरीच्या घरावर वारंवार होणाऱ्या कारवाईमुळे गेल्या वर्षभरात ती कॉलेजला गेली नाही. कारण घरावर कधीही हातोडा पडू शकतो म्हणून, ती आताही झोपडीत राहून देशासाठी खेळण्याचे स्वप्नं पाहत आहे. मी सर्व संकटांना सामोरे जात ते पूर्ण करेन. तसेच एक जबाबदार महिला बनेने, अशी इच्छा तिने ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली आहे.
मेरीने आतापर्यंत मिळवलेल्या अनेक प्रमाणपत्र, कमावलेली मेडल सध्या या झोपडीत धूळ खात पडलेली आहेत. गेल्या दीड वर्षात तिच्या घरावर चार वेळा अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या मेरीच्या आयुष्यात अनेक संकटे येत आहेत. आम्हाला या दीड वर्षात कोणीही विचारले नसल्याची खंत मेरीच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह अनेक स्थानिक राजकीय पक्षांनी तिला मदत करण्याची आश्वासने दिली. मात्र, अद्याप तिला कोणतीही मदत मिळाली नाही. कारण सरकारचा नियम आहे फक्त आश्वासने द्यायची ती पूर्ण करायची नाहीत. जागतिक महिला दिवसानिमित्त अनेक महिलांचा सर्व स्तरावर सन्मान होतो. परंतु, मुंबईसारख्या शहरात राहून परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या मेरीचे देशासाठी खेळण्याचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.